लातूर मनपाचा स्तुत्य उपक्रम; रुग्णालयात पोहोचण्यासाठी गरोदर मातांच्या सेवेत जननी रथ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 03:35 PM2023-01-09T15:35:03+5:302023-01-09T15:36:05+5:30
शहरात १४० आशा वर्कर्सनी केल्या मातांच्या नोंदी
लातूर: गरोदर मातांची प्रसूती सुरक्षित व्हावी, यासाठी लातूर मनपाने रुग्णालयात जाण्यासाठी जननी रथ तयार केला आहे. रुग्णालयात जाणे आणि सुटी झाल्यानंतर घरी पोहोचविण्यासाठी जननी रथ सेवेत राहणार आहे. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार १४० आशा वर्कर्सनी शहरातील गरोदर मातांच्या नोंदी केल्या असून, तारखेनिहाय अपेक्षित प्रसूतीचीही नोंद आशा वर्कर्सनी ठेवली आहे.
लातूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तसेच लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी गरोदर माता दाखल होतात. या रुग्णालयात जाण्यासाठी त्यांची गैरसोय होऊ नये, वेळेत रुग्णालयात पोहोचता यावे, यासाठी मनपाने खास सोय केली आहे. विशेष उपक्रमांतर्गत जननी रथ तयार केला आहे. २४ तास जननी रथ सेवा देणार आहे. ६ जानेवारीपासून ही सुविधा सुरू झालेली आहे. रुग्णालयात पोहोचविणे आणि सुटी झाल्यानंतर घरी आणण्याची जबाबदारी जननी रथाची असेल.
तारखेनिहाय अपेक्षित प्रसूती
लातूर मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आशा वर्कर्सनी गरोदर मातांच्या नोंदी केल्या आहेत. त्या मातांची प्रसूती कोणत्या तारखेत होऊ शकते, या संदर्भाची नोंदही आशा वर्कर्सनी घेतली आहे. या नोंदीनुसार आशा वर्कर्स मातांच्या संपर्कात राहणार आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दवाखाना आणि स्त्री रुग्णालयात दाखल करण्यासाठी अशा वर्कर्ससह जननी रथ सेवेत राहील.
व्हॉटस्ॲप ग्रुपवरून डिस्चार्जची माहिती
मनपाच्या आरोग्य विभागाने वुमन्स रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या मातांना सेवा देण्यासाठी या दोन्ही रुग्णालयांसोबत व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला आहे. शहरातील ज्या माता बाळंतपणासाठी या रुग्णालयात दाखल आहेत, त्यांना कधी सुटी मिळणार आहे, या संदर्भातची माहिती घेण्यासाठीही रुग्णालयासोबत व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला आहे. जेणेकरून गरोदर मातांना सुटी झाल्यानंतर घरी पोहोचविण्यासाठी जननी रथाची सुविधा मिळेल.
परिचारिका, स्वयंसेविकांचा संपर्क
प्राथमिक नागरी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा स्वयंसेविका यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील गरोदर मातांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करणे व डिस्चार्ज झाल्यानंतर घरी नेऊन सोडणे, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिचारिका, स्वयंसेविका मातांच्या संपर्कात राहतील, तशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या योजनेचा लाभ मातांनी घ्यावा, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
दोन दिवसांत दोन मातांना दिली सुविधा
६ जानेवारीपासून जननी रथ सेवेत दाखल झाला आहे. या जननी रथाची सेवा गेल्या दोन दिवसांमध्ये दोन मातांना दिली आहे. स्त्री रुग्णालयात तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी मातांना सोडण्यात आले, असे मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.