बीदरच्या आरक्षित कोट्यामुळे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय; जागा मिळत नसल्याने ओरड
By आशपाक पठाण | Published: January 20, 2024 07:07 PM2024-01-20T19:07:15+5:302024-01-20T19:08:37+5:30
लातूर ते मुंबई रेल्वेचा २०१७ मध्ये बीदरपर्यंत विस्तार झाला.
लातूर: लातूर ते मुंबई रेल्वेचा २०१७ मध्ये बीदरपर्यंत विस्तार झाला. आठवड्यातील तीन दिवस ही रेल्वे बीदरपर्यंत जात असल्याने लातूरच्या प्रवाशांना जागा मिळत नसल्याची ओरड निर्माण झाली. रेल्वेच्या विस्ताराबरोबरच दक्षिण मध्य रेल्वेने या गाडीत आरक्षित ८६५ जागांपैकी ७८० जागांचा रिमोट कोटा बीदरला अन् लातूरसाठी केवळ ८५ जागा आरक्षित ठेवल्या. यातून प्रवाशांची कोंडी होत आहे.
लातूरकरांची मदर ट्रेन असलेली लातूर ते मुंबई रेल्वे सुरळीतपणे प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असतानाही २५ एप्रिल २०१७ मध्ये ही गाडी बीदरपर्यंत नेण्यात आली. तेव्हापासून या गाडीत लातूरकरांना जागा मिळणे कठीण झाले आहे. आरक्षित रिमोट कोटा लातूरला देणे अपेक्षित असताना दक्षिण मध्य रेल्वेने बीदरला कोटा वाढवून तेथील प्रवाशांची सोय केली. इथे मात्र, लातूर, धाराशिव, बार्शीच्या प्रवाशांना जागाच मिळत नसल्याने इतर वाहनांचा आधार घेण्याची वेळ आली. बीदरचा रिमोट कोटा जनरल केल्यावर प्रवाशांची सोय होणार आहे, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जनरल कोट्यामुळे बीदर ते पुण्यापर्यंतच्या प्रवाशांना प्रथम बुकींग करणाऱ्यास सहजपणे जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मुंबई ते बीदर स्वतंत्र रेल्वे हवी...
लातूर ते मुंबई ही रेल्वे पूर्ववत करून सात दिवस लातुरातून सोडणे आवश्यक आहे. विस्तारित बीदर मार्गावर स्वतंत्रपणे नवीन गाडी सुरू केल्यास प्रवाशांची साेय होणार आहे. मागील सहा वर्षांपासून लातूरच्या प्रवाशांची परवड होत आहे. जागाच मिळत नसल्याने अनेकजण त्रस्त आहेत. मध्य रेल्वेने बीदर ते मुंबई रेल्वेला ज्याप्रमाणे तीनही दिवस जनरल कोटा केला आहे त्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वेने जनरल कोटा केल्यास सोय हाेणार आहे. - शामसुंदर मानधना, सदस्य, मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती.
प्रथम बुकिंग करणाऱ्यांना प्राधान्य...
बिदरचा जो ७८० जागांचा आरक्षित रिमोट कोटा आहे तो जनरल कोट्यात रूपांतरीत केल्यास बीदरपासून बार्शीपर्यंत कुणालाही सहजपणे तिकिट मिळेल. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने कोटा बदलासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.