लातूरात अभिनव मतदान केंद्र उभारणार; मतदारांना संजीवनी बेट, किल्ल्याची माहिती देणार
By आशपाक पठाण | Published: April 25, 2024 07:09 PM2024-04-25T19:09:31+5:302024-04-25T19:09:39+5:30
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांची संकल्पना
लातूर : लोकसभा निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांसह शैक्षणिक पॅटर्नची महती सांगणाऱ्या विविध विषयांना उजाळा देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून चार ठिकाणी अभिनव मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत. तसेच विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात एक केंद्र पर्यावरणपूरक असणार आहे.
लातूरची ओळख शिक्षणाची पंढरी म्हणून आहे, शैक्षणिक हब असलेल्या शहराची वाटचाल कशापध्दतीने सुरू आहे, याची माहिती देणारे फलक लातूर शहरातील जयक्रांती कनिष्ठ महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर लावली जाणार आहेत. तसेच चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील एका मतदान केंद्रात संजीवनी बेटाची माहिती देणारी कलाकृती उभारली जाणार आहे. संजीवनी बेटावर असलेल्या विविध वनस्पती त्यांचे पर्यावरणीय महत्व आदी बाबींचा त्यात समावेश असणार आहे. पश्मी आणि कारवन जातीच्या श्वानांच्या पैदासीसाठी प्रसिध्द असलेल्या चाकूर तालुक्यातील जानवळ येथील मतदान केंद्रावर याविषयी माहितीचे फलक लावले जातील. या गावात श्वानांच्या पैदासातून अनेकांना रोजगार मिळाला आहे, येथील श्वानांना देशासह परदेशातूनही मागणी असल्याची माहिती दिली जाणार आहे.
ऐतिहासिक भुईकोट किल्ला...
औसा आणि उदगीर येथे असलेल्या भुईकोट किल्ल्यांची माहिती दर्शविणारे फलक या दोन्ही शहरातील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर लावले जाणार आहेत. दोन्ही किल्ल्यांवर घडलेल्या ऐतिहासिक घटनांना यातून उजाळा दिला जाईल. नवीन पिढीला किल्ल्याची माहिती व्हावी, ऐतिहासिक वारसा जोपासला जावा, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी ही नवीन संकल्पना आणली आहे.
सहा ठिकाणी पर्यावरणपूरक मतदान केंद्र...
लातूर जिल्ह्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक पर्यावरणपूर्वक मतदान केंद्र तयार केले जाणार आहे. या मतदान केंद्रावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरणपूरक वस्तूचा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
चांगल्या कार्याची ओळख वाढावी...
लातूर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच मतदान केंद्र उभारणीत अभिनव संकल्पना राबविली जात आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग, युवा, सखी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र, आपल्या जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा, शिक्षण आदी बाबींची माहिती देणारे युनिक पोलींग स्टेशन यंदा उभारण्यात येत आहे. शिवाय, पर्यावरणपूरक मतदान केंद्रही उभारले जात आहेत. - वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हाधिकारी, लातूर.