देवणीत पंचायत राज समितीने शिक्षण ,आरोग्य विभागाची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:15 PM2018-09-12T12:15:36+5:302018-09-12T12:18:01+5:30
गेल्या महिनाभरापासुन धास्ती घेतलेल्या कर्मचारी व अधिकारी यांनी आज सुटकेचा श्वास सोडला.
- रमेश कोतवाल /सतीश बिरादार
देवणी (लातूर ) : आज सकाळी पंचायत राज समितीच्या पथकाने आज शाळा ,पशुवैद्यकीय दवाखाना ,प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी केली. मात्र ग्रामपंचायतकडे समिती फिरकली नाही. तासभराचा दौरा आटपून समितीने देवणी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत शिक्षण व आरोग्य विभागावर आपले समाधान झाले नसल्याचे समितीने सांगितल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. गेल्या महिनाभरापासुन धास्ती घेतलेल्या कर्मचारी व अधिकारी यांनी आज सुटकेचा श्वास सोडला.
आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह समितीत आ.श्रीकांत देशपांडे ,आ.भरत गोगावले ,आ.दत्तात्र्य सावंत ,सभापती सत्यवान कांबळे यांनी धनेगाव येथील जि.प.प्रा शाळेला भेट देवुन स्वयंपाक गृह ,विद्यार्थ्याची चौकशी केली.यावेळी १३ पाढा वाचावयास सांगितला अन् शाळेबद्दल समाधान व्यक्त केले.वलांडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देवुन प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या मांडला.दवाखान्यात रुग्णाची विचारपुस केली.रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेवुन येथील अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदाचा आढावा घेतला.शिवाय रुग्णाची काळजी घ्या ? वेळेवर उपचार करण्याचा सल्लाही दिला.यावेळी उपस्थित रुग्णाच्या व ग्रामस्थाच्या तक्रारी जाणुन घेतल्या अन् यापुढे अडचणी येणार नाहीत यासाठी खबरदारी घेण्याचा सज्जड सल्लाही समितीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
समितीसोबत उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके ,सभापती सत्यवान कांबळे ,उपसभापती शंकरराव पाटील ,जि.प.सदस्य प्रशांत पाटील ,गटविकासअधिकारी सोपान अकेले ,गटशिक्षणाधिकारी उज्ज्वलकुमार कुलकर्णी ,तालुका कृषी अधिकारी नाथराव देशमुख ,तालुका आरोग्य अधिकारी दिलीप गुरमे ,वि.अ.आर.सी.जाधव ,गोपनवाड आदीची उपस्थिती होती.
समितीची सर्वानी घेतली होती धास्ती...
समिती येणार असल्याने शाळा ,ग्रामपंचायत ,दवाखाने या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली होती.गेल्या आठ दिवसापासुन रेकार्ड अद्यावत करणे ,रंगरंगोटी ,परिसर स्वच्छता याबाबीकडे विशेष लक्षदिले होते.दरम्यान आज समितीचा दौरा झाल्यानंतर सर्वानी सुटकेचा श्वास सोडला.मात्र केवळ समिती येणार म्हणुन करण्यात येणाऱ्या देखाव्यापेक्षा वर्षभर सर्वानी इमानदारीने नोकरी केल्यास धास्ती घेण्याची गरज नसल्याचेही यावेळी बोलताना दिसून आले .
राज्यमार्गावरच समितीचे मार्गक्रमण...
उदगीर - निलंगा राज्यमार्गाच्या दुतर्फा तालुक्याचा विस्तार असताना समितीने फक्त राज्यमार्गावर असलेल्या कार्यालयाला भेटी देऊन आपला दौरा सोपा केला. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या अन् आर्थिक उलाढाल असलेली एकही ग्रामपंचायत न पाहिल्याने सर्वकाही अलबेल असल्याचे बोलले जात आहे. देवणीच्या आढावा बैठकीतही केवळ खातेप्रमुख यांनाच प्रवेश असल्याने फक्त तपासणी होती उलट तपासणी नव्हे असे समितीने स्पष्ट केले.