खासगी दवाखान्यांची झेडपीच्या आरोग्य पथकाकडून तपासणी; डॉक्टरांचे वाढले टेन्शन!

By हरी मोकाशे | Published: September 15, 2023 05:44 PM2023-09-15T17:44:35+5:302023-09-15T17:44:51+5:30

लातूर जिल्हा परिषद करत आहे हॉस्पिटलमधील आरोग्य सुविधांची पाहणी

Inspection of private hospitals by the ZP Health dept; Increased tension of doctors in Latur! | खासगी दवाखान्यांची झेडपीच्या आरोग्य पथकाकडून तपासणी; डॉक्टरांचे वाढले टेन्शन!

खासगी दवाखान्यांची झेडपीच्या आरोग्य पथकाकडून तपासणी; डॉक्टरांचे वाढले टेन्शन!

googlenewsNext

लातूर : ग्रामीण भागातील रुग्णांना नजिकच्या खाटा असलेल्या खासगी रुग्णालयात आरोग्यसेवेवर किती खर्च होईल, याचा सहजपणे अंदाज यावा तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे सेवा-सुविधा आहेत का याची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे गावपातळीवरील डॉक्टरांचे टेन्शन वाढले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या ग्रामीण भागातील सुश्रुषागृहाची (खासगी दवाखाना) वर्षातून किमान दोनदा तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यात केवळ खाटा असलेल्या दवाखान्यांची पाहणी करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील गाव पातळीवर नोंदणीकृत एकूण ११३ खासगी दवाखाने आहेत. या दवाखान्यांनी रुग्ण हक्क संहिता, आरोग्य सुविधेचे दरपत्रक, वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती, शिवाय तक्रार निवारण कक्ष आदी फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.

बहुतांशवेळा ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्यसेवेच्या दराविषयी माहिती नसते. परिणामी, दवाखान्यात उपचार झाल्यानंतर सेवा शुल्कावरून वाद होतात. असे विविध प्रश्न निर्माण होऊ नयेत. तसेच चांगली आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांना आणखीन प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण भागात ही तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

खाटा असलेल्या हॉस्पिटलची तपासणी...
बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार नोंदणीनुसार खाटा असलेल्या ग्रामीण भागातील दवाखान्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यात केवळ ओपीडी असलेल्या दवाखान्यांची तपासणी केली जात नाही. जर तक्रार आल्यास त्याची चौकशी केली जाते, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

या आजारांची माहिती देणे आवश्यक...
जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांनी कॉलरा, प्लेग, घटसर्प, डेंग्यू, गोवर, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू, क्षयरोग यासह अन्य आजारांच्या रुग्णांची माहिती जिल्हा आरोग्य विभागास देणे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुठेही कुठल्याही आजाराची साथ उद्भवल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास मदत होते.

चांगली आरोग्य सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहन...
शासनाच्या नियमानुसार आरोग्य विभागाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. चांगली आरोग्य सेवा देणाऱ्या डाॅक्टरांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच त्रुटी आढळल्यास त्याच्या पूर्ततेसाठी सूचना करण्यात येऊन नियमाप्रमाणे वेळ देण्यात येणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कार्यवाहीस सामोरे जावे लागणार आहे.
- डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

ग्रामीण भागात नोंदणीकृत ११३ दवाखाने...
तालुका - दवाखाने
निलंगा - १९
रेणापूर - ०२
उदगीर - ११
शिरूर अनं. - ०५
देवणी- ०९
चाकूर - १४
जळकोट - ०५
अहमदपूर- १६
औसा - १२
लातूर - २०
एकूण - ११३

Web Title: Inspection of private hospitals by the ZP Health dept; Increased tension of doctors in Latur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.