खरीप पिकांना विम्याचे कवच; लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ५८ कोटींची बचत
By हरी मोकाशे | Published: August 7, 2023 07:30 PM2023-08-07T19:30:27+5:302023-08-07T19:32:19+5:30
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत ४ लाख शेतकऱ्यांचा सहभाग
लातूर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्यासाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार ४५९ शेतकऱ्यांनी ८ लाख ३० हजार ५०५ प्रस्ताव सादर केले आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या एक रुपयात खरीप पीक संरक्षित योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ५८ कोटी ७२ लाख ५१ हजार ४६३ रुपयांची बचत झाली आहे.
जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ९९ हजार हेक्टर आहे. यंदा मृगाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आर्द्रा नक्षत्रात पावसाने बरसात केली. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात पेरण्यांना प्रारंभ झाला. तद्नंतर मध्यम स्वरुपाच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. दरम्यान, अतिवृष्टी, पावसाचा खंड, रोगराई अशा विविध कारणांनी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात आली आहे. यंदा या योजनेअंतर्गत केवळ एक रुपयामध्ये पीकविम्याचे संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. शेतकऱ्यांच्या हप्त्याची रक्कम राज्य सरकार पीकविमा कंपनीकडे भरणार आहे. राज्य शासनाच्या या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात योजनेत सहभाग नोंदविला आहे.
५ लाख ६६ हजार हेक्टरवरील पिकांचा विमा...
नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी साेयाबीनचे उत्पादन घेतात. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा होतो. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जिल्ह्यातील एकूण ३ लाख ९७ हजार ४५९ शेतकऱ्यांनी सहभाग घेत ८ लाख ३० हजार ५०५ प्रस्ताव सादर केले आहेत. शेतकऱ्यांनी ५ लाख ६६ हजार ४७३ हेक्टरचा पीकविमा उतरविला आहे.
औसा तालुक्यात सर्वाधिक शेतकरी...
जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी औसा तालुक्यात असून ६६ हजार ८९२ आहेत. अहमदपूर - ४३ हजार ५७४, चाकूर - ३८ हजार ६०, देवणी- २२ हजार २७५, जळकोट - १९ हजार १०१, लातूर- ५० हजार ३५२, निलंगा - ६४ हजार ७८१, रेणापूर - ३४ हजार १६५, शिरुर अनंतपाळ- १९ हजार २२३ आणि उदगीर तालुक्यातील ३९ हजार ३६ अशा एकूण ३ लाख ९७ हजार ४५९ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.
- रक्षा शिंदे, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एवढी बचत...
तालुका - प्रस्ताव - बचत रक्कम
अहमदपूर - ११४९९० - ६ कोटी ५९ लाख
औसा - १२५९०० - ९ कोटी ७१ लाख
चाकूर - ७६०८५ - ५ कोटी ८१ लाख
देवणी - ४८२७६ - ३ कोटी २० लाख
जळकोट - ५७४६० - २ कोटी ७२ लाख
लातूर - ७२७२९ - ७ कोटी ७३ लाख
निलंगा - १४६२६९ - ८ कोटी ९७ लाख
रेणापूर - ५२०७५ - ५ कोटी ११ लाख
शिरुर अनं. - ३६१५१ - २ कोटी ७० लाख
उदगीर - १००५७० - ६ कोटी १३ लाख
एकूण - ८३०५०५ - ५८ कोटी ७२ लाख