कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:18 AM2021-05-15T04:18:45+5:302021-05-15T04:18:45+5:30
कोरोनासंबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाखांचे सानुग्रह साहाय्य लागू करण्याचे आदेश २९ मे २०२० ...
कोरोनासंबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाखांचे सानुग्रह साहाय्य लागू करण्याचे आदेश २९ मे २०२० रोजी राज्य शासनाने दिले होते. सदरील आदेश ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू होते. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या मृत्यूची प्रकरणे वित्त विभागाच्या सहमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती.
दरम्यान, राज्यात कोविडची दुसरी लाट पसरली. हा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी हे जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा करीत असताना कोविडमुळे स्वत:चे प्राण गमवावे लागले. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना मुदतीमुळे ५० लाखांचे सानुग्रह साहाय्य मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे या साहाय्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करून पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून शुक्रवारी राज्य शासनाने सहसचिव विवेक दहिफळे यांनी सदरील सानुग्रह साहाय्यासाठी १ जानेवारी २०२१ पासून ते ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलासा...
काेराेनामुळे मृत्यू होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या ५० लाखांच्या सानुग्रह साहाय्याची मुदत संपुष्टात आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, आपण मुख्यमंत्र्यांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुदतवाढ मिळाली असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले.