लातूर RTO कार्यालयात इंटरनेट सेवा कोलमडली, 2 हजार दस्तावेज रखडले

By आशपाक पठाण | Published: October 3, 2022 09:09 PM2022-10-03T21:09:31+5:302022-10-03T21:09:40+5:30

बिघाड सापडेना : वाहनधारकांसह डिलरही झाले त्रस्त

Internet service collapsed in Latur RTO office, 2 thousand documents were stuck | लातूर RTO कार्यालयात इंटरनेट सेवा कोलमडली, 2 हजार दस्तावेज रखडले

लातूर RTO कार्यालयात इंटरनेट सेवा कोलमडली, 2 हजार दस्तावेज रखडले

googlenewsNext

आशपाक पठाण

लातूर : पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन कारभारावर भर देणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील पाच दिवसांपासून इंटरनेट सेवा कोलमडल्याने कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी, वाहनधारकांसह, वाहन विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. सोमवारी दिवसभर बीएसएनएल कर्मचाऱ्यांकडून नेमका बिघाड कुठे झालाय, याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. परिवहन विभागाकडून ऑनलाइन कामावर भर देण्यात आला आहे. मात्र, ऑनलाइन कामात नेहमीच इंटरनेटचा खोळंबा होत असल्याने ऑफलाइनच बरे होते, अशी भावना वाहनधारकांमध्ये निर्माण होत आहे.

लातूरच्या कार्यालयातील इंटरनेट बुधवारपासून बंद पडले आहे. नेमका बिघाड कुठे झाला, याचा शोध लागत नसल्याने अधिकारीही हैराण झाले आहेत. दसऱ्यामुळे नवीन वाहनांची खरेदी जोमात आहे; पण पासिंग अन् त्यांना देण्यात येणारा नंबरची सिस्टीम ऑनलाइन असल्याने विक्रेत्यांनाही वाहनधारकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिवहन कार्यालयाकडून चार दिवसांपासून बीएसएनएलकडे पाठपुरावा करण्यात येत होता. सोमवारी दुपारी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमका बिघाड कुठे झाला, याचा शोध सुरू केला असून, सायंकाळपर्यंत सेवा सुरू झाली नव्हती. आज काम होईल, या अपेक्षेने चार दिवसांपासून खेटे मारणाऱ्या वाहनधारकांना सोमवारीही तसेच घरी परतावे लागले. कार्यालयाबाहेर काम करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल चालकांनाही इंटरनेट बंदचा फटका सहन करावा लागत आहे.

दोन हजार दस्तावेज रखडले

चार ते पाच दिवसांपासून इंटरनेट सेवा कोलमडल्याने जवळपास २ ते अडीच हजार प्रकरणे रखडली आहेत. वाहनांची नवीन नोंदणी, टॅक्स भरणे, फिटनेस आदी कामे रखडल्याने अनेक वाहनधारक कार्यालयाला खेटे मारत आहेत. इंटरनेट सेवा बंद असल्याचे सांगून कर्मचारी मोकळे होत आहेत.
बिघाड शोधण्याचे काम सुरू : विजय भोये

परिवहन कार्यालयात मागील चार ते पाच दिवसांपासून इंटरनेट सेवा कोलमडली आहे. बीएसएनएलची लाइन असल्याने संबंधितांना फोनवरून माहिती दिली. पत्रव्यवहार केल्यानंतर सोमवारी बीएसएनएलच्या पथकाने बिघाड शोधण्याचे काम सुरू केले आहे. सध्या दसरा असल्याने अनेकजण नवीन वाहन खरेदी करीत असून, इंटरनेट बंद पडल्याने कामे रखडली आहेत. सध्या दुरुस्तीचे काम आहे, लवकरच सेवा कार्यान्वित होईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी सांगितले.

Web Title: Internet service collapsed in Latur RTO office, 2 thousand documents were stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.