आरटीओ कार्यालयात पाच दिवसानंतर इंटरनेट सेवा सुरळीत; बीएसएनएलच्या पथकाने केले काम
By आशपाक पठाण | Published: October 4, 2022 09:50 PM2022-10-04T21:50:13+5:302022-10-04T21:50:27+5:30
मंगळवारी दिवसभर कामकाज सुरळीत
लातूर : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील पाच दिवसांपासून बंद पडलेली इंटरनेट सेवा मंगळवारी सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसभरात रखडलेली अनेक कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. दसऱ्यामुळे कामे वाढली. पण नेट बंद पडल्याने अधिकारीही त्रस्त झाले होते.
लातूरच्या कार्यालयातील इंटरनेट बुधवारपासून बंद पडले होते. नेमका बिघाड कुठे झाला, याचा शोध लागत नसल्याने अधिकारीही हैराण झाले आहेत. दसऱ्यामुळे नवीन वाहनांची खरेदी जोमात आहे. पण, पासिंग अन् त्यांना देण्यात येणारा नंबरची सिस्टीम ऑनलाईन असल्याने विक्रेत्यांनाही वाहनधारकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सोमवारी बीएसएनएलच्या पथकाने दिवसभर तपासणी करून तांत्रिक बिघाड दुरूस्त केला. कार्यालयीन वेळ संपल्यावर इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी सकाळी नियमितपणे कामकाज सुरू करण्यात आले. पाच दिवसानंतर इंटरनेट सुरू झाल्याने लवकर काम करून घेण्यासाठी नागरिकांची वर्दळ अधिक दिसून आली.
रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न...
परिवहन कार्यालयात मागील चार ते पाच दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद झाली होती. बीएसएनएलची लाइन असल्याने संबंधितांना फोनवरून माहिती दिल्याने सोमवारी दिवसभर प्रयत्न करून बीएसएनएलच्या पथकाने बिघाड शोधून काढला. पाच दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा मंगळवारी नियमितपणे सुरू झाली. रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी सांगितले.