मोटार वाहन निरीक्षकांच्या मध्यावधी बदल्यांमुळे धाकधूक, संघटनेचाही आक्षेप
By आशपाक पठाण | Published: October 9, 2023 08:19 PM2023-10-09T20:19:11+5:302023-10-09T20:19:32+5:30
दोन वर्षांपासून नुसतेच चर्चेचे गुऱ्हाळ
आश्पाक पठाण, लातूर: राज्य शासनाच्या बदली अधिनियमांतर्गत एकाच ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी बदलीसाठी पात्र असतात. या बदल्या दरवर्षी एप्रिल, मे अखेरपर्यंत होणे अपेक्षित असते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात राज्यातील परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकांची झोप उडाली असून, आता बदली झाल्यावर मुलांचे शिक्षण, नवीन घर, शाळेचा शोध घ्यायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य परिवहन विभागात कोरोनापासून बदली प्रक्रिया रखडल्याने अनेकजण बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. दोन वर्षांपासून एप्रिल, मे महिन्यात बदलीपात्र असलेले अधिकारी शासन निर्णयाकडे लक्ष ठेवून असतात. यंदाही अनेकांना बदलीची अपेक्षा असताना वरिष्ठ स्तरावर कागदी घोडे नाचविण्यात आले. ऑक्टोबर महिन्याचे दोन आठवडे होत आले तरी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
बदलीपात्र अधिकाऱ्यांना त्यांना अपेक्षित पसंती क्रमांकही घेण्यात आला आहे. जवळपास दहा दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू असून, या आठवड्यात निर्णय झाला तर जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सध्या जे अधिकारी कौटुंबिक तथा इतर कारणाने गैरसोयीच्या ठिकाणी असतील तर त्यांच्या विनंती बदल्या करण्यात याव्यात, अशी विनंती संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
राज्यात ६०० जणांच्या बदल्या, लातूरच्या दहा जणांचा समावेश...
राज्यातील १६६ मोटार वाहन निरीक्षक, जवळपास ३३४ सहायक मोटार वाहन निरीक्षक बदलीपात्र आहेत. लातूर, धाराशिव येथील १० जणांचा त्यात समावेश आहे. यातील अनेकांचा कार्यकाळ चार ते पाच वर्षांचा झाला आहे. तीन वर्षांची बदली असल्याने सर्वजण एप्रिल, मे महिन्यात शासन निर्णयाकडे लक्ष देऊन असतात. यंदा बदल्या होणार म्हणून वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात आले. मात्र, ऑक्टोबर महिन्याचे दोन आठवडे होत आले तरी निर्णय झाला नसल्याने अधिकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही घालमेल वाढली आहे.
आता शाळेत प्रवेश, मुलांची परीक्षा कशी होईल...
आता मध्यावधी बदल्या करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू असल्याने अधिकाऱ्यांनी मात्र मध्यावधी बदल्या होऊ नयेत, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. एप्रिल, मे महिन्यात बदल्या झाल्यावर मुलांच्या शाळा, घर बदलीची प्रक्रिया सहज हाेते. काहींच्या मुलांची सहामाही परीक्षा सुरू आहे. त्यामुळे सरसकट बदल्या झाल्यास अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
ज्येष्ठता यादीवर अनेकांचा आक्षेप...
बदलीसंदर्भात परिवहन विभागाकडून सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. त्यात गंभीर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण यावर कोणताच विचार करण्यात आला नसल्याचा आक्षेप अनेक अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यावर कसलीच कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. आता शासन काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.