चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; लातूरकरांसाठी अभिमानाची बाब
By आशपाक पठाण | Published: August 24, 2023 09:00 PM2023-08-24T21:00:16+5:302023-08-24T21:00:41+5:30
नदी हत्तरगा येथील उमेश स्वामी यांचा समावेश
लातूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान ३ मोहिमेला खूप मोठे यश मिळाले. विक्रम लँडर हे यान चंद्राच्या दक्षिण गोलार्धात यशस्वीपणे लँड करण्यात आले. या अभिमानास्पद कामगिरीत लातूर जिल्ह्यातील नदी हत्तरगा (ता.निलंगा) येथील मूळचे रहिवासी असलेले उमेश रमेश स्वामी या शास्त्रज्ञाचा सहभाग राहिला आहे. ही लातूरकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
नदी हत्तरगा येथील रमेश स्वामी हे सैन्यदलात कार्यरत होते. त्यामुळे ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. त्यांना तीन मुले आहेत. त्यातील उमेश मोठा मुलगा आहे. १२ वी पर्यंतचे शिक्षण सैनिकी शाळेत झाले. त्यानंतर सोलापूर, पुणे येथे पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. एमएस.सी मॅथ शिक्षण झाल्यावर सेट, नेट नंतर पीएच.डीही केली. पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात काही दिवस प्राध्यापक म्हणून काम केले. २०११ मध्ये इस्रोमध्ये बेंगलोर येथे उमेश स्वामी शास्त्रज्ञ म्हणून रूजू झाले. मागील १२ वर्षांपासून ते कार्यरत आहेत. चांद्रयान ३ मोहिमेत त्यांनी सहभाग नोंदविल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे वडील माजी सैनिक रमेश स्वामी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मुलाच्या कामगिरीचा सार्थ अभिमान...
आमचे मूळ गाव नदी हत्तरगा आहे. मी सैन्यदलात असल्याने पुण्यात स्थायिक झालो. मला तीन मुले असून दोन अभियंते आहेत. तर तिसरा उमेश स्वामी यांनी एमएससी मॅथचे शिक्षण पूर्ण केल्यावर पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात काही दिवस प्राध्यापक म्हणून काम केले. २०११ साली त्यांनी इस्रोत शास्त्रज्ञ म्हणून सेवा सुरू केली. चांद्रयान मोहिमेत लँडिग पूर्ण झाल्यावर सिग्नलच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता,त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे वडील रमेश स्वामी म्हणाले.