उन्हामुळे सिंचन विहीर खोदकामास वेग; पावणेदोन लाख मजुरांच्या हाताला काम !
By हरी मोकाशे | Published: June 1, 2024 06:53 PM2024-06-01T18:53:02+5:302024-06-01T18:54:03+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याेजना
लातूर : उन्हामुळे जलसाठे आटत आहेत तर जलस्रोत कोरडे पडत आहेत. शिवाय मजुरांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सिंचन विहिरींच्या कामांना वेग आला आहे. सध्या २ हजार २१८ कामांच्या माध्यमातून १ लाख ८१ हजार ८२४ मजुरांना रोजगार मिळत आहे.
मजुरांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा आणि हाताला काम मिळावे म्हणून शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत शेतीकामे नसल्याने मजुरांपुढे कामाचा प्रश्न निर्माण होतो. त्यातून नागरिकांचे स्थलांतर होण्याची दाट शक्यता असते. अशी परिस्थिती उद्भवू नये तसेच प्रत्येक मजुरास गावात काम उपलब्ध व्हावे म्हणून मग्रारोहयोंतर्गत सिंचन विहीर, बांबू लागवड, घरकूल, वृक्ष लागवड व संगाेपन, रस्ता, शेततळे, जनावरांचा गोठा, ग्रामपंचायत- अंगणवाडी बांधकाम अशी कामे सुरू आहेत.
पावणेतीन लाख मजुरांना रोजगार...
तालुका - मजूर
अहमदपूर - ३१२०६
औसा - ४०७३३
चाकूर - ६३८८२
देवणी - २२००२
जळकोट - १९५७८
लातूर - ४५५४२
निलंगा - २०४००
रेणापूर - ७६८६
शिरुर अनं. - १४७६
उदगीर - १२३०५
एकूण - २६४८१०
जिल्ह्यात एकूण ३३४५ कामे सुरू...
जिल्ह्यातील ७८६ पैकी ५४८ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ३ हजार ३४५ कामे सुरू आहेत. या कामांची मजूर क्षमता २५ लाख ९३ हजार ११७ एवढी आहे. सध्या २ लाख ६४ हजार ८१० मजूर काम करीत आहेत. उन्हाळ्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सिंचन विहिरीची सर्वाधिक कामे...
मग्रारोहयोंतर्गत जिल्ह्यात नऊ प्रकारची कामे सुरू आहेत. त्यात सिंचन विहिरीची २२१८, बांबू लागवड- ९, घरकूल - ३३२, वृक्ष लागवड व संगाेपन- ११६, रस्ता- २९८, शेततळे- ५३, जनावरांचा गोठा- ३१२, ग्रामपंचायत, अंगणवाडी बांधकाम- ६, स्मशानभूमी शेड- १ अशी कामे सुरू आहेत.
ग्रामपंचायतीस सूचना...
गावातील मजुरांना गावातच मग्रारोहयोंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याच्या ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. मजुरांकडून मागणी होताच काम उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील ३३४५ कामांवर २ लाख ६४ हजार ८१० मजूर काम करीत आहेत, असे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातून सांगण्यात आले.