सैन्य भरतीसाठी म्हणून तो दिल्लीला गेला; मजूर माय-बापानं सांगितली अमोलची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 05:18 AM2023-12-14T05:18:56+5:302023-12-14T05:23:25+5:30
सैन्य भरतीला जातो म्हणून चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल धनराज शिंदे याने चार दिवसांपूर्वीच गाव सोडले होते.
चाकूर (जि. लातूर) : सैन्य भरतीला जातो म्हणून चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल धनराज शिंदे याने चार दिवसांपूर्वीच गाव सोडले होते. गेल्या सहा महिन्यात तो तीन-चार वेळा दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. तो सैन्य भरतीसाठी अनेकदा बाहेरगावी जात असे, अशी माहिती समोर आली आहे.
संसदेबाहेर निदर्शने करणाऱ्या दोघांपैकी एक अमोल शिंदे आहे. तो चाकूर तालुक्यातील झरी बु. गावचा रहिवासी असून तपास यंत्रणेचे वेगवेगळे पथक गावात दाखल झाले. अमोलचे आई-वडील मोलमजुरी आणि मंदिरात झाडलोट करतात. त्याचा मोठा भाऊ मुंबई येथे मिस्त्री काम, तर दुसरा भाऊ लातूरमध्येच मोलमजुरी करतो. एक बहीण विवाहित आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण झालेल्या अमोलला खेळात आवड असल्याने तो पोलिस व सैन्य भरतीची तयारी करीत होता, असे ग्रामस्थांनी सांगितले.
दोन दिवसांपासून मोबाइल बंद
९ डिसेंबरला रात्री ७ वाजता तो दिल्लीला जातो म्हणून गेला. सोबत डबा दिला. तिकडे काय झाले माहीत नाही. २ दिवसांपासून त्याचा मोबाइल बंद आहे, असे त्याचे वडील धनराज, आई केशरबाई यांनी सांगितले.