पावसाची दमदार बॅटिंग; रस्त्यावर पाणीच पाणी..! लातुरात साेमवारी रात्री तीन तास जाेरदार पाऊस
By राजकुमार जोंधळे | Published: June 10, 2024 11:52 PM2024-06-10T23:52:39+5:302024-06-10T23:53:20+5:30
लातूर शहरासह जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. शनिवार, रविवार आणि साेमवारी पावसाने काही गावांना झाेडपून काढले.
राजकुमार जाेंधळे
लातूर : मृग नक्षत्राच्या प्रारंभीला पावसाने जाेरदार बॅटिंग सुरू केली आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांत साेमवारी सायंकाळी धुवाधार पावसाने हजेरी लावली. लातुरात रात्री ८ ते ११ या काळात माेठा पाऊस झाला असून रस्त्यावर सर्वत्र पाणीच...पाणी थांबले हाेते. शिवाय, सखल भागात पाणी थांबल्याने स्थानिक नागरिकांची माेठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली.
लातूर शहरासह जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. शनिवार, रविवार आणि साेमवारी पावसाने काही गावांना झाेडपून काढले. लातुरातील पाच नंबर चाैकात, प्रमुख रस्त्यावर पाणी साचले हाेते. पूर्व भागातील सखल भागात पाणी साचले हाेते, तर काहींच्या घरात पाणी शिरले. लातुरातील काही भागांत पावसाळ्यापूर्वी गटारी स्वच्छ करण्यात आल्या नाहीत. परिणामी, गटारीत तुंबलेले प्लास्टिक, कचरा पावसाच्या पाण्यात रस्त्यावरून वाहत हाेता.
लातूर जिल्ह्यात सर्वदूर झाला पाऊस...
लातूरसह जिल्ह्यातील बाेरगाव काळे, हरंगुळ बु., रेणापूर, येराेळ, निलंगा शहरासह तालुक्यातील निटूर, औराद शहाजानी, हलगरा, कासार शिरसी, औसा शहरासह तालुक्यातील खराेसा, बेलकुंड, चाकूरहरासह तालुक्यातील काही गावांत साेमवारी पावसाने हजेरी लावली.
चाकुरात पाऊस; वीजपुरवठा खंडित...
चाकूर : शहरासह तालुक्यातील काही गावांत साेमवारी सायंकाळच्या सुमारास जाेरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पावसाने रात्री चाकुरातील वीजपुरवठा खंडित झाला हाेता, तर बाेरगाव काळे परिसरात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास धुवाधार पाऊस झाला आहे.
औसा शहरासह तालुक्यात पाऊस...
औसा : साेमवारी रात्रीच्या वेळी झालेला पाऊस हा औसा शहरासह तालुक्यात सर्वदूर आहे. परिणामी, औशातील सखल भागातील घरात पावसाचे पाणी शिरले आहे. जवळपास साडेतीन तास पाऊस झाल्याने नागरिकांची माेठ्या प्रमाणावर गैरसाेय झाली.
माकणीत वीज पडून म्हैस ठार...
निलंगा : तालुक्यातील माकणी थाेर येथील शेतकरी तुकाराम पांडुरंग सूर्यवंशी यांच्या शेतात वीज पडून म्हैस दगावल्याची घटना साेमवारी सायंकाळी ५ वाजता घडली. यात ७० हजारांचे नुकसान झाले आहे. गत दाेन दिवसांपासून निलंगासह तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. या घटनेची माहिती तलाठी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, मंगळवारी पंचनामा केला जाणार आहे.