निदान झालेल्या क्षयरुग्णांची नाेंद करणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:12 AM2021-02-19T04:12:14+5:302021-02-19T04:12:14+5:30
२०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत हा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाच्यावतीने विशेष जनजागृती मोहीम राबविली जात आहे. अनेक ...
२०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत हा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाच्यावतीने विशेष जनजागृती मोहीम राबविली जात आहे. अनेक क्षयरोग रुग्ण खासगी पॅथालॉजी लॅब, औषध विक्रेत्यांकडे जाऊन औषधोपचार करतात. परिणामी, जिल्हा क्षयरोग विभागाकडे या रुग्णांची नाेंद राहत नाही. त्यामुळे सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची माहिती शासनाकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद न झाल्यास कार्यवाही होऊ शकते.
भारत सरकारच्या अधिसुचनेच्या अनुषंगाने आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका, लातूर शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पॅथॉलॉजी लॅब, रेडिऑलॉजिस्ट व औषध विक्रेते यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व आपले लातूर शहर क्षयरोगमुक्त करण्यासाठी आपणाकडे नवीन निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती तत्काळ जिल्हा क्षयरोग अधिकारी व जिल्हा पीपीएम समन्वयक यांच्याकडे सादर करावी, असे आवाहनही जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी यांनी केले आहे.