पुण्याला नातेवाइकांकडे जाऊन २४ तासही झाले नाही; इकडे लातुरात चाेरट्यांनी घर फाेडले

By राजकुमार जोंधळे | Published: May 21, 2024 07:07 PM2024-05-21T19:07:52+5:302024-05-21T19:08:19+5:30

तीन लाखांचा मुद्देमाल लंपास, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत

It wasn't even 24 hours after I went to Pune to visit relatives; Here in Latur the theft in the house | पुण्याला नातेवाइकांकडे जाऊन २४ तासही झाले नाही; इकडे लातुरात चाेरट्यांनी घर फाेडले

पुण्याला नातेवाइकांकडे जाऊन २४ तासही झाले नाही; इकडे लातुरात चाेरट्यांनी घर फाेडले

लातूर : पुण्याला नातेवाइकांकडे गेलेल्या गुत्तेदाराचे लातुरातील घर चाेरट्यांनी फाेडल्याची घटना उघडकीस आली असून, चाेरट्यांनी साेन्या-चांदीच्या दागिन्यांसह राेकड असा दोन लाख ९७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना लातुरातील वृंदावन काॅलनी येथे रविवार ते साेमवार दरम्यान घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मंगळवारी पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाेलिसांनी सांगितले की, बसवराज सिद्रामय्या स्वामी (वय ६०) हे व्यवसायाने गुत्तेदार आहेत. लातुरातील औसा राेडवरील वृंदावन कॉलनीत त्यांचे घर आहे. रविवार, १९ मे राेजी ते घराला टाळे लावून पुण्याला एका नातेवाइकाकडे गेले हाेते. दरम्यान, चाेरट्यांनी बंद असलेल्या घराचा कडी-कोयंडा, कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात कपाटाचे लाॅक तोडून ड्राॅव्हरमध्ये ठेवलेले पाच तोळे सोन्याचे आणि १२ ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रक्कम ६७ हजार रुपये असा दोन लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. साेमवारी बसवराज स्वामी हे पुणे येथून लातुरातील घरी दाखल झाल्यानंतर घरफाेडीची घटना उघड झाली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिसांना माहिती देण्यात आली. या माहितीनंतर स्थानिक पाेलिस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास पाेलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे करीत आहेत.

अन् बंद घरावर चाेरट्यांचा डाेळा...

लातुरातील वृंदावन काॅलनीत फिर्यादीच्या बंद असलेल्या घरावर अज्ञात चाेरट्यांनी डाेळा ठेवून घरफाेडी केल्याची घटना समाेर आली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक जण सहलीवर, लग्नकार्यासाठी आणि नातेवाइकांकडे जातात. अशावेळी घराला टाळे लावल्याचे हेरून अनेक चाेरट्यांकडून घरे फाेडण्याचे प्रकार घडत आहेत. बंद घरावर डाेळा ठेवूनच हे घर फाेडल्याचे पाेलिसांनी सांगितले.

अवघ्या २४ तासांमध्ये चाेरट्यांकडून घर साफ...

फिर्यादी हे रविवारी पहाटे पुण्याला गेले आणि लातुरात साेमवारी पहाटे आले. अवघ्या २४ तासांत चाेरट्यांनी घरावर नजर ठेवत साेन्या-चांदीचे दागिने, राेकड असा मुद्देमाल पळविला. साेन्या-चांदीचे दागिने, राेकडशिवाय इतर वस्तूंना चाेरट्यांनी हातही लावला नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Web Title: It wasn't even 24 hours after I went to Pune to visit relatives; Here in Latur the theft in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.