उदगीरमधील ट्रामा केअरची इमारत पूर्ण होऊन दीड वर्ष झाले; हस्तांतर होईना !

By संदीप शिंदे | Published: August 29, 2023 03:30 PM2023-08-29T15:30:56+5:302023-08-29T15:31:44+5:30

आरोग्य विभागाला अद्यापही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरित केली नाही

It's been a year and a half since the trauma care building in Udgir was completed; yet not transfer! | उदगीरमधील ट्रामा केअरची इमारत पूर्ण होऊन दीड वर्ष झाले; हस्तांतर होईना !

उदगीरमधील ट्रामा केअरची इमारत पूर्ण होऊन दीड वर्ष झाले; हस्तांतर होईना !

googlenewsNext

उदगीर : ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी ट्रामा केअर युनिटचा दुसरा टप्पा क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी तीन वर्षांपूर्वी पुढाकार घेत सुरु केला होता. ही इमारत तयार होऊन दीड वर्षाचा कालावधी झाला असून, इमारत बांधकाम पूर्ण आहे. मात्र, आरोग्य विभागाला अद्यापही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरित केली नसल्याने व उपचारासाठी लागणाऱ्या मशिनरी व उपकरणांची उपलब्धता नसल्याने रुग्णांना लातूर किंवा इतर शहरात उपचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे बांधकाम विभाग इमारतीचे हस्तांतरण कधी करणार असा प्रश्न आहे.

उदगीर शहराचा भौगोलिक विस्तार झपाट्याने होत असून, प्रशासनाला नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागत आहेत. त्या अनुषंगाने उदगीर येथील सामान्य रुग्णालयाच्या बाजूला ट्रामा केअर युनिटची स्थापना करण्यात आली. या ट्रामा केअरसाठी ४ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी खर्च करून इमारत तयार झाली आहे. ही इमारत तयार होऊन दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली. कोरोना काळात या इमारतीचे काम चालू असताना आरोग्य विभागामार्फत रुग्णसेवेसाठी तात्पुरत्या स्वरूपात या इमारतीचा वापर करण्यात आला होता. परंतु मूळ ट्रामा केअरसाठी लागणारी उपकरणे व मशिनरी अद्यापपर्यंत बसविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे.

रुग्ण उपचारासाठी आलाच तर त्यावर प्राथमिक उपचार करून लातूर किंवा इतर शहरात रेफर केले जात आहे. ट्रामा केअर युनिटसाठी लागणारे डॉक्टर व कर्मचारी नेमणूक प्रशासनाकडून झाली आहे. परंतु उपकरणेच नसल्यामुळे डॉक्टर व कर्मचारी काय करणार असा प्रश्न आहे. त्यामुळे या इमारतीचे लवकरात लवकर हस्तांतरण करून रुग्णांच्या सेवेसाठी ट्रामा केअर युनिट सुरू करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

तांत्रिक बाबी पूर्ण करून हस्तांतरण...
ट्रामा केअरसाठी ४ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी खर्च करून दीड वर्षापूर्वी इमारत तयार झाली आहे. लिफ्ट, फायर सेफ्टी सारख्या काही तांत्रिक बाबी शिल्लक असल्यामुळे इमारत पूर्ण होऊन कागदोपत्री हस्तांतरित करता आली नाही. लवकरच तांत्रिक बाबी पूर्ण करून ही इमारत रुग्णालयाकडे हस्तांतरित करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीरचे उपअभियंता लक्ष्मण देवकर यांनी सांगितले.

उपकरणांसाठी वरीष्ट कार्यालयाकडे पाठपुरावा...
ट्रामा केअर युनिटसाठी लागणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नेमणूक प्रशासनाकडून केली आहे. आवश्यक बाबींची बांधकाम विभागाने पूर्तता न केल्यामुळे इमारत अद्याप आमच्याकडे हस्तांतरित झालेली नाही. उपकरणे व मशिनरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण झाल्यास ट्रामा केअर युनिट रुग्णासाठी लवकरच उपलब्ध होईल असे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय महिंद्रकर म्हणाले.

Web Title: It's been a year and a half since the trauma care building in Udgir was completed; yet not transfer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.