दुष्काळी अनुदान, पीकविम्यासाठी तहसीलसमोर जागरण गाेंधळ
By हरी मोकाशे | Published: January 29, 2024 07:04 PM2024-01-29T19:04:27+5:302024-01-29T19:04:54+5:30
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रेणापुरात आंदोलन
रेणापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान, पीकविमा द्यावा, दुष्काळ सवलती लागू कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
शेतकरी क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष सचिन दाने यांच्या नेतृत्वात जागरण गोंधळ आंदोलन करीत शासनास साकडे घालण्यात आले. अल्प पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी खरीपातील सोयाबीनच्या नुकसानीपोटी आग्रीम देण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, तालुक्यातील कारेपूर महसूल मंडळ वगळता अन्य चार मंडळास आग्रीम मिळाला नाही. तसेच राज्य शासनाने रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करीत अध्यादेश काढला. पण, अद्यापही उपाययोजना राबविल्या जात नाहीत. रब्बीतील हरभरा पिकाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शासन अध्यादेश असताना बँक, पीकविमा कंपनी, महावितरण व प्रशासन त्याची अमलबजावणी करीत नाही.
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एकरी १५ हजार दुष्काळी अनुदान द्यावे. शेतीशी निगडित कर्जमाफ करावे. तालुक्यातील पाचही मंडळातील वंचित शेतकऱ्यांना आग्रीमसह शंभर टक्के पीकविमा तात्काळ द्यावा. सक्तीची कर्ज वसुली बंद करावी. सक्तीची वसुली करणाऱ्या बँकेवर कारवाई करावी. तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात. महावितरणने सक्तीची वीजबिल वसुली थांबावी. शेतकऱ्यांच्या मुला- मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, शासकीय कागदपत्रे आठवडाभरात मिळावित. रेणापूर तहसीलमध्ये ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. त्यामुळे स्वतंत्र स्वच्छतागृह बांधावे अशा मागण्या करण्यात आल्या.