अहमदपुर येथे आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 19:10 IST2018-08-27T19:10:10+5:302018-08-27T19:10:40+5:30
विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.

अहमदपुर येथे आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचे जेलभरो आंदोलन
अहमदपूर(लातूर ) : मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण व संरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़
मुस्लिम समाजाची परिस्थिती शासन नियुक्त समित्यांनी शासनापुढे मांडत आपला अहवाल सादर केला होता़ परंतु, शासनाने या अहवालांकडे दुर्लक्ष केला आहे़ समाजाच्या मागण्या प्रलंबित ठेवल्या आहे़ मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी होत आहे. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. तसेच मोफत शिक्षण देणे गरजेचे आहे़ यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़
उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात येऊन राज्य शासनाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ मुस्लिम समाजाबरोबर मराठा समाज, धनगर समाज व लिंगायत समाजालाही शासनाने आरक्षण द्यावे, अशा घोषणा देण्यात आल्या़
विविध समाजांचा पाठिंबा
मुस्लिम समाजाच्या या आंदोलनास काँग्रेस, राष्ट्रवादी, मराठा सेवा संघ, मराठा समाज, धनगर समाजाने पाठिंबा दर्शविला़ मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीही मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे. शासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी, अशी केली़ दरम्यान, कार्यकर्त्यांनी स्वत:हून अटक करवून घेतली़ काही वेळाने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोडून दिले़.