वाकी साठवण तलावात जल समाधी आंदोलन; अहमदपूरला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 04:33 PM2021-11-09T16:33:08+5:302021-11-09T16:33:29+5:30
या कामाचे टेंडर निघून काम २ वर्षात पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही ५ वर्षे झाली तरी सुध्दा पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण झालेले नाही.
अहमदपुर : शहराला एक दिवसा आड पाणीपुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी अहमदपूर येथील वाकी साठवण तलावात साजीदभाई मित्रमंडळाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात २० ते २५ जणांनी पुलावरून वाकी साठवण तलावात उडी घेतली. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात येतील असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याने आंदोलक पाण्याबाहेर आले.
शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने ४४ कोटी ५२ लाख ८१ हजार ८०८ रुपये निधी मंजूर झाला. या कामाचे टेंडर निघून काम २ वर्षात पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही ५ वर्षे झाली तरी सुध्दा पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पाण्याविना शहरवासियांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून, २५ ते ३० दिवसांत एकदा शहरात पाणी पुरवठा होत आहे. नवीन पाणी पाईपलाईनसाठी शहरामध्ये केलेल्या खड्यावर काँक्रेट बेड टाकण्यात आले नाही. नविन कनेक्शन मोफत देण्याची तरतुद असतानाही दोन ते अडीच हजार रुपये प्रत्येकी कनेक्शनला घेतले जात आहे. जुन्या गावामध्ये पाईपलाईन टाकलेली नाही. नागरीकांची गैरसाेय होत असल्याने साजीदभाई मित्र मंडळाच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात साजीदभाई मित्रमंडळाचे अध्यक्ष साजीदभाई शेख, तालुकाध्यक्ष जाबेर पठान, शफीक बागवान, सलमान पठान, मोसीन शेख, बकशलाला शेख, महबूब शेख, घुडू साब मिस्त्री, मोबीन शेख, याकुब पठाण, हैदर बाबा, जमील खान, सुधीर लामतुरे, जिलाणी सय्यद, इम्रान पठाण, खादर लष्करी, एजाज सय्यद, पापा चाऊस, माजीद बागवान, गफ्फार मनियार, मुकद्दर शेख, सलीम सय्यद, अफसर शेख, इसाक तांबोळी, फारूख सय्यद, आजम शेख ,अस्लम शेख, अर्जुन गायकवाड, रज्जाक शेख रज्जब पठाण, नजीब सय्यद, हसन शेख, सोहेल चाऊस, किशोर वाघमारे, गौस बागवान, मोबीन सय्यद, मैनोद्दीन सय्यद, पठाण अजहर, अक्रम शेख सहभागी होते.
योजनेच्या कामाची चौकशी करावी...
अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या लिंबोटी धरणात पाण्याचा मुबलक पाणीसाठा असून सुध्दा शहराला २५ ते ३० दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याने चौकशी झाली पाहिजे. १७ कोटीचा झालेला भ्रष्ट्राचार जनतेसमोर यावा, अन्यथा आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा साजीदभाई मित्र मंडळाचे अध्यक्ष साजीदभाई सय्यद यांनी दिला.