जळकोट बाजार समितीतील मापतोल बंद, हमाल- मापाड्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:43+5:302021-05-16T04:18:43+5:30
जळकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील ४७ गावांतील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. सध्या रबीचा हा हंगाम संपुष्टात ...
जळकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील ४७ गावांतील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. सध्या रबीचा हा हंगाम संपुष्टात आल्याने शेतीमालाची आवक कमी झाली आहे. मात्र, सोयाबीन, हरभ-याच्या दरात वाढ झाल्याने हा शेतमाल साठवण केलेले शेतकरी आता शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तो रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, ७ ते १४ मे या कालावधीत बाजार समितीही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले.
शुक्रवारपासून सकाळी ११ वा. पर्यंत बाजार समितीतील व्यवहार सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली असली तरी खेड्यापाड्यातील शेतकरी आपला शेतमाल घेऊन येईपर्यंत वेळेची मुदत संपत आहे. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होत आहे. कडक निर्बंध लागू करण्यापूर्वी दररोज किमान हजार क्विंटलपर्यंत शेतमालाचे व्यवहार होत असत. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असे. आता ५० ते १०० क्विंटलपर्यंत व्यवहार होत आहेत. दरम्यान, हमाल मापाडी, वाहन चालकांना काम नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बाजार समितीत तूर, सोयाबीनची नाममात्र स्वरुपात आवक होत आहे. परिणामी, शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे अर्थचक्र कोलमडले आहे.
वाहतुकीचे २५ ट्रक उभे...
लॉकडाऊनमुळे शेतमालाची विक्री करणे शेतक-यांना कठीण झाले आहे. परिणामी, शहरातील बाजार समितीत शेतमाल वाहतूक करणारे २५ ट्रक जागेवरच उभे आहेत. भाडे मिळत नसल्याने बँकेचे हप्ते कसे फेडावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, बँक, फायनान्स चालकांकडून सातत्याने वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. हप्ता भरण्यासाठी सवलत द्यावी. तसेच व्याज आकारण्यात येऊ नये, अशी मागणी मोटार मालक संघाकडून करण्यात येत आहे.
मासिक ५ हजार अनुदान द्या...
काही दिवसांपासून बाजार समितीत नाममात्र प्रमाणात व्यवहार होत आहेत. परिणामी, हाताला काम मिळत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मासिक ५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी हमाल मापाडी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
व्यवहार नसल्याने वेतन नाही...
बाजार समितीत ५५ आडत दुकाने आहेत. तसेच हमाल मापाडी जवळपास शंभर आहेत. लॉकडाऊनमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. बाजार समितीतील कर्मचा-यांना वेळेवर वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत. कडक निर्बंधामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे बाजार समितीचे प्रशासक अमोल वाघमारे व सचिव बालाजी उगिले यांनी सांगितले.