जनआरोग्य योजनेचा गोरगरीबांना आधार; लातूरात १० वर्षांत २० हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
By हरी मोकाशे | Published: February 5, 2024 05:14 PM2024-02-05T17:14:09+5:302024-02-05T17:15:13+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
लातूर : गोरगरिब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी जनआरोग्य योजना कवच ठरत आहे. गत दहा वर्षांत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण २० हजार ३८३ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.
राज्यातील गोरगरीब रुग्णांना गंभीर, अतिगंभीर आजारावर गुणवत्तापूर्ण उपचार व शस्त्रक्रिया मोफत व्हाव्यात म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्यात येत आहेत. कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड व मुत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लॉस्टिक सर्जरी, जळीत, स्त्रीरोग, नवजात व बालरोग, त्वचारोग, नेत्रशस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, फुफ्फुस आजारावरील उपचार अशा प्रकारच्या ९९६ आजारांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जातात. तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत १२०९ गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार केले जातात.
गतवर्षी ३५४० रुग्णांवर उपचार...
वर्ष - उपचार झालेले रुग्ण
२०१४ - २८०
२०१५ - ५२२
२०१६ - ६१४
२०१७ - ९४८
२०१८ - १८१२
२०१९ - २०२७
२०२० - २३९२
२०२१ - ४३२१
२०२२ - ३९२७
२०२३ - ३५४०
एकूण - २०३८३
विभागात द्वितीय स्थानावर...
जनआरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचारात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात पाच वर्षांपासून प्रथम स्थानावर आहे. त्याचबरोबर विभागस्तरावर द्वितीय क्रमांकावर आहे. त्याबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला आहे.
योजनेच्या लाभासाठी ही हवी कागदपत्रे...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजना राबविण्यात येत आहेत. योजनेच्या लाभासाठी शिधापत्रिका, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, आयुष्मान कार्ड अशा कागदपत्रांची आवश्यक आहे. या योजनेचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी केले आहे.
लाभ देण्यासाठी आरोग्य शिबीर...
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि रुग्णांना योजनेचा लाभ देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने दर महिन्यास ग्रामीण भागात मोफत आरोेग्य शिबीर घेण्यात येते. त्यातून औषधोपचार देण्याबरोबर आयुष्मान कार्डही काढून देण्यात येत आहे, असे डॉ. मेघराज चावडा यांनी सांगितले.
योजना आरोग्य विमा कवच...
महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत दहा वर्षांत २० हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत. या योजना गोरगरीबांसाठी आरोग्य कवच आहे. रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा.
- डॉ. उदय मोहिते, अधिष्ठाता.