लातूरात क्षुल्लक वादातून थेट जेसीबीच्या खोऱ्याने हल्ला; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 20:39 IST2024-08-14T20:39:16+5:302024-08-14T20:39:59+5:30
संतप्त जमावाने जेसीबीचालकाला चांगला चाेप दिला, दाेघांविरुद्ध गुन्हा

लातूरात क्षुल्लक वादातून थेट जेसीबीच्या खोऱ्याने हल्ला; एकाचा मृत्यू
लातूर : भाजीचा गाडा लावण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून भाजी विक्रेत्यांना शिवीगाळ करून कॅरेटने मारहाण केली. शिवाय, जेसीबीचा समाेरील खाेऱ्या सिनेस्टाईल फिरवला. दरम्यान, हा खाेऱ्या एकाच्या छातीत लागल्याने ताे ठार झाला आहे. ही घटना लातुरातील कन्हेरी काॅर्नर राेडवर साेमवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात मंगळवारी दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर संतप्त जमावाने जेसीबीचालकाला चांगला चाेप दिला.
पाेलिसांनी सांगितले, वैशाली बालाजी परीट (वय ३९, रा. पटेलनगर, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, यातील जेसीबी (एमएच २४ एएस ९४११) चालक विनायक रासुरे आणि इतर एकाने संगनमत करून, भाजीचा गाडा लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून शिवीगाळ करून, रिकाम्या कॅरेटने मारहाण केली. शिवाय, जेसीबीच्या समाेरील खाेऱ्या जाेरजाेरात फिरवला. यावेळी छातीत जेसीबीचा खाेऱ्या लागल्याने जालिंदर मनोहर मुळे (वय ३५, रा. पटेलनगर, लातूर) हे गंभीर जखमी झाले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना लातुरातील कन्हेरी चौक ते कव्हा नाका जाणाऱ्या रोडवरील कॉर्नरवर कन्हेरी चौकात साेमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. संतप्त जमावाने जेसीबीचालकाला चांगला चाेप देत पकडले, अशी माहिती पाेलिसांनी दिली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुरनं. ५३५/२०२४ कलम १०५, ११५, ३५२, ३ (५) भारतीय न्याय संहितेनुसार (बीनएनएस) गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेउपनि. एस. एस. साेनवणे करीत आहेत.