शिरूर अनंतपाळ तालुक्यातील प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 AM2021-07-22T04:14:04+5:302021-07-22T04:14:04+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील बागायती शेतीचे भवितव्य मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यातील धरण शंभर टक्के भरणे आवश्यक ...
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील बागायती शेतीचे भवितव्य मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यातील धरण शंभर टक्के भरणे आवश्यक आहे, परंतु निम्मा पावसाळा संपत आला असला, तरीही पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील धरण साठ्याची पाणी पातळी जेमतेम आहे. परिणामी, बागायती शेतीसह पाणीपुरवठा योजना धोक्यात आहेत.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी मध्यम प्रकल्प तर डोंगरगाव बॅरेज, हालकी कोल्हापुरी बंधारा आहे. त्यामुळे शिरूर अनंतपाळची प्रकल्पाचा तालुका म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील गावासह इतर तालुक्यातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. धरण साठ्यातील पाण्यावर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बागायती शेती केली जाते. त्यामुळे पाणीपुरवठा योजनासह बागायती शेतीचे भवितव्य धरणाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून असल्याने तालुक्यातील धरण शंभर टक्के भरणे आवश्यक आहे. मागील वर्षी पहिल्याच मोठ्या पावसात धरण साठे ओव्हर फ्लो झाले होते, परंतु यंदा जुलै महिना उलटत आला असला, तरीही धरणातील साठ्याची पाणी पातळी जेमतेम आहे. अद्यापही उपयुक्त पाणीसाठा २० टक्क्यांच्या आतच आहे. त्यामुळे धरण साठे ओव्हर फ्लो होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
घरणी प्रकल्पात ५ दलघमी पाणीसाठा...
तालुक्यातील सर्वच धरणातील पाणी साठ्याची पाणी पातळी जेमतेम आहे. यामध्ये घरणी धरणात ५.३१४० दलघमी, साकोळ १.८४७ दलघमी, पांढरवाडी ०.३१६१ दलघमी पाणीसाठा आहे. डोंगरगाव बॅरेज रिकामा असून, तालुक्यातील धरण साठे अत्यल्प असल्याचे चित्र आहे.
उपयुक्त पाणीसाठा अत्यल्प....
प्रकल्प साठ्यातील उपयुक्त पाणीसाठा २५ टक्क्यांच्या आत आहे. यामध्ये घरणी प्रकल्पात केवळ २३.६५ टक्के, साकोळ प्रकल्पात १६ .८६ टक्के, पांढरवाडी प्रकल्पात १३.७९ टक्के एवढा पाणीसाठा असून, तालुक्याच्या पावसाची सरासरी ७५० मिलीमीटर आहे, परंतु तालुक्यात आतापर्यंत ३०४ मिलीमीटर एवढाच पाऊस पडला आहे.