घरफाेड्यांतील अट्टल गुन्हेगार जाळ्यात; आठ लाखांचे दागिने जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: February 13, 2024 09:35 PM2024-02-13T21:35:36+5:302024-02-13T21:36:28+5:30
९ घरफाेड्यांचा छडा : स्थागुशाची कारवाई
राजकुमार जाेंधळे / लातूर : विविध ठाण्यांच्या हद्दीत घरफाेड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या पाेलिस पथकाने मंगळवारी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून राेकड, साेन्याचे दागिने असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाैकशीत ९ घरफाेड्यांचा उलगडा झाला असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफाेडी करून लाखाे रुपयांचा मुद्देमाल पळविण्याच्या घटना अलीकडे माेठ्या प्रमाणावर घडल्या असून, याचा छडा लावण्यासाठी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने गुन्हेगारांचा शाेध सुरू केला. दरम्यान, रेकाॅर्डवरील अट्टल गुन्हेगारांचा माग काढण्यात आला. घरफोडीतील गुन्हेगार चाेरीतील दागिने विक्रीसाठी अहमदपूर बसस्थानक परिसरात फिरत आहे, अशी माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. या माहितीची पडताळणी करून पाेलिस पथकाने तातडीने अहमदपूर गाठले. बसस्थानक परिसरात फिरणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले.
पाच साथीदारांच्या मदतीने केल्या घरफाेड्या...
विश्वासात घेत त्याची चाैकशी केली असता, त्याने छोटा मोहन बापूराव भोसले (वय ३४, रा. कुरुळा, ता. कंधार, जि. नांदेड), असे आपले नाव सांगितले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली. त्यात सोन्याचे दागिने आढळून आले. अधिक चाैकशीअंती त्याने पाच साथीदारांसाेबत विविध ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांची कबुली दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. प्रवीण राठोड, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, रामभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.
९ घरफाेड्यांची आराेपीकडून कबुली...
लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी, औसा, निलंगा, किल्लारी, देवणी, कासार शिरशी, शिरूर अनंतपाळ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या एकूण ९ घरफाेडींच्या गुन्ह्याची अटकेतील आराेपीने कबुली दिली आहे. त्याच्याकडून चाेरीतील १२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २२ हजार रोख, असा ८ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. इतर फरार साथीदारांचा पाेलिस शाेध घेत आहेत.