एकाच कालावधीत दोन ठिकाणी नोकरी
By Admin | Published: June 19, 2014 11:59 PM2014-06-19T23:59:29+5:302014-06-20T00:46:16+5:30
चाकूर : एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच काळात नोकरीस दाखवून, फसवणूक केली़ या आरोपावरून एका शिक्षकास चाकूर पोलिसांनी अटक केली़
चाकूर : एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच काळात नोकरीस दाखवून, फसवणूक केली़ या आरोपावरून एका शिक्षकास चाकूर पोलिसांनी अटक केली़ चाकूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश मनोज नेपते यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी दिली़ चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी (ह़मु़ लातूर) येथील उमाकांत भिमराव किडीले हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राठोडा (ता़ निलंगा) येथे सहशिक्षक म्हणून नोकरीस होते़ सन २००८ ते ११ या कालावधीत जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून पूर्णवेळ पूर्ण पगारावर नोकरी करीत होते़ याच कालावधीत संगय्या स्वामी अध्यापक विद्यालय व कै़ इंदिरा पाटील अध्यापक महाविद्यालय चाकूर येथे प्राध्यापक म्हणून पूर्णवेळ व पूर्ण पगारावर नोकरी केलेचे प्राथमिक तपासात सिद्ध झाले आहे़ उमाकांत किडिले यांनी सहशिक्षक आणि प्राध्यापक म्हणून एकाच कालावधीत दोन ठिकाणी नोकरी करून फसवणूक केली, अशी फिर्याद शिवहर मन्मथ स्वामी यांनी चाकूर पोलिसांत दिली होती़ (वार्ताहर)
चाकूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून एकाच कालावधीत दोन ठिकाणी नोकरी करत असलेले कागदपत्रे हस्तगत केली़ मंगळवारी रात्री उमाकांत किडिले यांना अटक करून बुधवारी चाकूर न्यायालयात हजर केले़ न्या़ नेपते यांनी किडिले याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली़ पुढील तपास पोनि़ गजानन सौदाने, पोहेकॉ वैजनाथ दिंडगे करत आहेत़