जावयाने कापले सासऱ्याचे नाक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 12:56 PM2018-06-17T12:56:12+5:302018-06-17T12:56:12+5:30
माहेरी गेलेली बायको सासरी परतत नसल्याने संतापलेल्याजावयाने सासऱ्याच्या नाकाचा चावा घेतल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.
लातूर - माहेरी गेलेली बायको सासरी परतत नसल्याने संतापलेल्याजावयाने सासऱ्याच्या नाकाचा चावा घेतल्याची घटना लातूर जिल्ह्यातील भादा गावात घडली आहे. पत्नी सासरी येत नसल्याने सासऱ्याशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर सदर जावयाने सासऱ्याच्या नाकाचा चावा घेतला. दरम्यान, पोलिसांनी या माथेफिरू जावयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संतोष असे या माथेफिरू जावयाचे नाव असून, त्याची पत्नी अनेकदा सांगूनही सासरी येत नव्हती. त्यामुळे संतापलेला संतोष तिला आणण्यासाठी भादा या गावी गेला होता. तेथे पत्नी सासरी येत नसल्याने त्याचा सासऱ्यासोबत वाद झाला. त्याचदरम्यान त्याची सासऱ्यासोबत बाचाबाची झाली आणि रागाच्या भाराता संतोषने सासऱ्याच्या नाकाचा चावा घेतला. सासऱ्याचे नाक कापले गेल्याचे पाहताच संतोष तिथून पसार झाला. तर सासऱ्याने तुटलेले नाक घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत सासऱ्याचे नाक कापणाऱ्या जावयाचा शोध सुरू केला आहे.