काेराेनाने लग्नासाठीच्या अपेक्षांमध्ये झाला बदल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:58+5:302021-09-02T04:43:58+5:30
लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लग्न साेहळ्याच्या गर्दीवर आता मर्यादा आली आहे. त्यामुळे लग्नासाठीच्या अपेक्षांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. विवाह ...
लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लग्न साेहळ्याच्या गर्दीवर आता मर्यादा आली आहे. त्यामुळे लग्नासाठीच्या अपेक्षांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. विवाह साेहळ्यांचा धामधूमपणा, हाेणारा भरमसाठ खर्च, बडेजाव, ट्रेड आता बदलला आहे. सध्या काेराेनाच्या नियमांना प्राधान्य देत अनावश्यक खर्चाला फाटा दिला जात आहे. एकमेकांकडील माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसाेहळा उरकण्यावर भर दिला जात आहे. यातून वधू आणि वराकडील कुटुंबीयांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. एकमेकांच्या अडचणी समजून घेत, त्यातून मार्ग काढत लग्न साेहळ्याला अनेकांनी प्राधान्य दिले आहे. अतिशय साध्या पद्धतीने हाेणाऱ्या लग्न साेहळ्यांमुळे अनेक कुटुंबांवर पडणारा खर्चाचा बाेजा यातून दूर हाेत आहे. मुला-मुलींचे वाढते वय, करियरची चिंता यामुळे अनेकांनी अनुरुप जाेडीदार पाहण्यावर भर दिला आहे.
या अपेक्षांची पडली भर...
काेराेना काळात करियरला महत्त्व आणि ते घडविण्यासाठी हाेणारी मदत याला प्राधान्य दिले जात आहे.
मार्च २०२०पासून सर्वच व्यवहार ठप्प आहेत. शिवाय नाेकरी, राेजगारावरही संकट काेसळले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वधूकडील मंडळींनी मदत करावी, अशी अपेक्षा वाढली आहे.
तर वधू-वराच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. शिवाय करियरसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा वाढली आहे.
या अपेक्षा झाल्या कमी...
काेराेना काळात मानपान, बडेजावपणाची अपेक्षा कमी झाली आहे. माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न उरकण्यावर भर आहे.
मंगल कार्यालयाला दूर सारत घराच्या अंगणातच लग्न करुन द्या, अशी अपेक्षा वराकडील मंडळींची वाढली आहे. यातून लग्न उरकणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
हुंडा आणि साेन्याच्या दागिन्यांची मागणीही कमी झाली आहे. एकमेकांची गरज ओळखून लग्नाला प्राधान्य दिले जात आहे.
वधू-वर सूचक मंडळ चालक म्हणतात...
काेराेनाने लग्नाच्या पद्धती, गरजा आणि ट्रेड बदलला आहे. पूर्वी मंगल कार्यालयातच लग्न करण्यावर वराकडील मंडळींचा भर असायचा. आता छाेट्याशा हाॅलमध्ये, घरासमाेरील अंगणातही लग्न हाेत आहेत. आता पाहुण्यांच्या गर्दीवर माेठ्या प्रमाणावर नियंत्रण आले आहे. यातून वधू आणि वराकडील मंडळींच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. - बालाजी साेनकांबळे, लातूर
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासनाकडून काही निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. लग्न साेहळ्यात हाेणाऱ्या गर्दीवर मर्यादा आली आहे. अशास्थितीत काही माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसाेहळा उरकण्यावर भर आहे. यावेळी भरमसाठ अपेक्षा ठेवल्या जात नाहीत. आहे त्या परिस्थितीत लग्न करण्याला प्राधान्य दिले जात आहे. - मनाेहरराव डाकरे, निलंगा