येथेही दादागिरी! कर्नाटकची बस एसटीच्या लालपरीवर पडतेय भारी; लाखोंच्या उत्पन्नाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 06:35 PM2022-11-23T18:35:23+5:302022-11-23T18:41:01+5:30

एसटीच्या तुलनेत कर्नाटक बसेसच्या फेऱ्या अधिक

Karnataka's bus take over on ST's Lalpari; Millions of income lost every day | येथेही दादागिरी! कर्नाटकची बस एसटीच्या लालपरीवर पडतेय भारी; लाखोंच्या उत्पन्नाचा फटका

येथेही दादागिरी! कर्नाटकची बस एसटीच्या लालपरीवर पडतेय भारी; लाखोंच्या उत्पन्नाचा फटका

googlenewsNext

- बालाजी थेटे
औराद शहाजानी :
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरातील गावात एसटी महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक बसेस या मार्गावर सुसाट धावत असून, लाखो रुपयांचे उत्पन्न कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेस घेऊन जात आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील काही गावांवर दावा सांगितला आहे. याचसोबत कर्नाटक आता राज्याचा महसूल देखील पळवत असल्याचे चित्र आहे. 

औराद शहाजानी येथून नवीन लातूर-जहीराबाद हा तीन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे वाहतूकसेवा गतिमान झाली असून, दक्षिण भारताशी कनेक्टिविटी वाढली आहे. औराद शहाजानीसह अनेक गावे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात येतात. त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी लातूर-निलंगा, उदगीर-अहमदपूरसह अनेक बस स्थानकातून बससेवा पुरविली जाते. औराद शहाजानी हे माेठे गाव व महाराष्ट्रातील शेवटचे बस स्थानक आहे. या ठिकाणी बाजार समिती, शाळा, महाविद्यालये असल्याने, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे निलंगा आगाराच्या दर अर्ध्या तासाला एक बस ये-जा करीत होती. मात्र, कोरोना प्रादुर्भाव ओसरल्यानंतरही १३ रूटवरील बस बंद आहेत. सध्या औराद शहाजानी येथे एकूण २८ फेऱ्या सुरू आहेत, तर कर्नाटक बसच्या औराद शहाजानी येथे ४० फेऱ्या होत आहेत. परिणामी, कर्नाटकमधील बसवकल्याण व भालकी, हुमनाबाद या डेपोच्या गाड्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सेवा देत, दररोज लाखोंचे उत्पन्न आपल्या राज्यामध्ये घेऊन जात आहेत. राज्यातील लाल परीच्या कमतरतेमुळे उभ्या डोळ्यासमोर प्रवासी घेऊन जाताना केवळ बघ्याची भूमिका बस चालकांना घ्यावी लागत आहेत.

या गाड्याच्या फेऱ्या झाल्या बंद...
लातूर-बिदर, निलंगा-भालकी, औराद-उमरगा, औराद-तुगाव, औराद-वलांडी, औराद-उदगीर, सोलापूर-औराद, कळंब-हैद्राबाद, कळमनुरी-औराद औराद-मेहकर, औराद- बसवकल्याण, तसेच अर्ध्या तासाला चालणारी निलंगा-औराद या गाड्या बंद करून, आता एक ते दीड तासाने एक गाडी धावत आहेत. याउलट बसवकल्याण-औरादसाठी कर्नाटक महामंडळाच्या अर्ध्या तासाला बसेस आहेत.

कर्नाटककडून औरादसाठी जादा बसेस...
याशिवाय कर्नाटक डेपाेने कल्याण-औरादसह बिदर-लातूर, हुमनाबाद-लातूर, भालकी-औराद, हैद्राबाद-निलंगा, कलबुर्गी-निलंगा अशा अनेक बसगाड्या जादा सुरू केल्या आहेत. यातील केवळ लांब पल्ल्याच्या गाड्यांची नाेंद स्थानकात हाेते. अनेक कर्नाटक बस औराद स्थानकात येतच नाहीत. त्यांची महाराष्ट्र बस स्थानक दप्तरी नाेंदच होत नसल्याचे चित्र आहे.

स्थानकाऐवजी मुख्य चौकात थांबतात बसेस...
कर्नाटकच्या बसेस बस स्थानकात न येताच, महामार्गावरील चौकात थांबून जातात. त्यामुळे नोंद करण्यास अडचणी येत असल्याचे बस स्थानक प्रमुख यादव माटीकर यांनी सांगितले. अपुऱ्या गाड्यांची संख्या व चालकांची संख्या कमी असल्यामुळे औराद शहाजानी व काही गावातील रूट बंद आहेत, असे निलंगा बस स्थानक प्रमुख अशाेक पवार यांनी सांगितले.

Web Title: Karnataka's bus take over on ST's Lalpari; Millions of income lost every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.