लातूरहून निघालेली केदारनाथ, बद्रिनाथ यात्रा बस नेपाळ हद्दीत पेटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 02:23 PM2018-05-11T14:23:04+5:302018-05-11T14:23:04+5:30
लातूरहून एकूण 49 प्रवाशांसह 55 जणांना घेवून केदारनाथ, बद्रिनाथ यात्रेला निघालेली एक खासगी बस नेपाळ हद्दीत शुक्रवारी(11 मे) पहाटे पेटवण्यात आली.
लातूर : लातूरहून एकूण 49 प्रवाशांसह 55 जणांना घेवून केदारनाथ, बद्रिनाथ यात्रेला निघालेली एक खासगी बस नेपाळ हद्दीत शुक्रवारी(11 मे) पहाटे पेटवण्यात आली. दरम्यान, सर्व भाविक सुखरुप असून, बसमधील सर्व साहित्य व जवळपास 5 लाख रुपये रोख जळून खाक झाले आहेत. यात्रा व्यवस्थापक सिद्धेश्वर मोहिते यांनी सांगितले. लातूर येथून 49 भाविक व इतर सहका-यांसह 55 जणांची खासगी बस 30 एप्रिल रोजी प्रवासाला निघाली होती. केदारनाथ-बद्रिनाथ यात्रा करुन ही बस नेपाळ दर्शनासाठी 9 मे रोजी पुढे निघाली.
मात्र, भरत घाटामध्ये बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे भाविकांची जवळच निवास व्यवस्था करण्यात आली. तर यात्रा व्यवस्थापकाचे साडेतीन लाख रुपये तसे इतर भाविकांची रक्कम, सोबत आणलेल्या साहित्याच्या पिशव्या, महिनाभराचे किराणा साहित्य बसमध्येच होते. त्यामुळे बसमध्ये चालकासह चार जण झोपले होते. अचानक शुक्रवारी पहाटेच्या १ वाजेच्या सुमारस बसच्या डाव्या बाजूकडील चाक पेटल्याचे रामदास अंगद इरले यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बसची राखण करण्यासाठी बसमध्येच झोपलेले सर्वजण बाहेर पडले.
सोबत असलेल्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अपयश आले. शेवटी, बसमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर यात्रा व्यवस्थापकाने सर्व भाविकांना भरत घाट येथून भारताच्या हद्दितील महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा या तालुक्याच्या ठिकाणी आणले. सध्या हे सर्व भाविक नौतनवा येथील धर्मशाळेत आश्रयाला असून, कोणालाही इजा झालेली नाही, असे मोहिते यांनी सांगितले. परंतु, सर्व साहित्य जळाल्याने अंगावरील कपड्यावरच हे भाविक धर्मशाळेत आश्रयाला आहेत. यात्रा व्यवस्थापक दुस-या बसची व्यवस्था करुन सर्वांना लातूरला परत आणणार आहेत. तोपर्यंत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी तेथील प्रशासानाशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिका-यांकडून मदत...
यात्रेतील एका भाविकाकडून लातूर येथील सतीश जाधव यांना घडल्या प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी सदर माहिती ‘लोकमत’ला कळवून अडकलेल्या भाविकांना मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याशी संवाद साधून भाविकांना मदत करण्याची प्रक्रिया सुरु झाली.