जागते रहा, अन्यथा उद्या उठणार नाहीत; व्हायरल मेसेजने अनेकांची झोप उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 10:09 AM2020-03-26T10:09:23+5:302020-03-26T10:11:20+5:30
जागते रहो ची अफवा ; गुन्हे दाखल होणार
लातूर : शासकीय रुग्णालयात विचित्र बाळ जन्माला आले आहे. जागते रहा, अन्यथा जे झोपले ते उद्या उठणार नाहीत, अशी अफवा फोनवरून पसरवण्यात आली. ज्यामुळे अनेक भाबड्या लोकांनी रात्र जागून काढली.
अनेकांचे रात्री 12 ते 3 दरम्यान दूरध्वनी खणखणले जागे रहा, असा संदेश नवजात बाळाने दिला आहे. आणि लोक एकमेकांना फोन करू लागले. मुलांना उठवले. अगदी वर्ष सहा महिन्याच्या लेकरांना रडवून उठवले, झोपू दिले नाही. अनेक खेड्यात तर अख्खे गावे जागे राहिले. ही अफवा होती, ज्याला आपण बळी पडलो, हे लोकांना कळत असतानाही अनेकांची झोप उडाली.
दरम्यान यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ राजेंद्र माने म्हणाले, अशा लोकांच्या फोनचे लोकेशन घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणीही अशा चुकीच्या माहितीचा प्रचार, प्रसार करू नये. जशी कोरोनाची साखळी तोडायची तशी सुजाण नागरिकांनी अशा चुकीच्या माहितीचे तिथेच खंडन करायचे. आपल्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, तसेच नजीकच्या अधिकाऱ्यांना बोला. पोलीस, सायबर सेल अशी माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहे.