उदगीरातील ऑटो चालकांना आता खाकीचा ड्रेस बंधनकारक
By संदीप शिंदे | Published: August 22, 2023 04:43 PM2023-08-22T16:43:10+5:302023-08-22T16:45:04+5:30
फ्रंट शीट घेणाऱ्या ८० चालकांवर पोलिसांची कारवाई
उदगीर : शहरातील ऑटो चालकांना आता खाकीचा ड्रेस घालून ऑटो चालवणे बंधनकारक करण्यात आले असून, ड्रेस न वापरणाऱ्या व फ्रंट सीटवर प्रवाशी घेणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई करण्याची मोहीम शहर पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.
उदगीर शहरात ४ हजार बेकायदेशीर ऑटो सुरू आहेत. केवळ १ हजार ऑटो परवानाधारक आहेत. पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी शहरातील ऑटोंना शिस्त लावण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ऑटो चालकांना खाकीचा ड्रेस घालून ऑटो चालवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ड्रेसविना ऑटो चालवीत असतील किंवा फ्रंट सीटवर प्रवाशी घेऊन ऑटो चालवीत असतील त्या ऑटो चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसात ८० ऑटो चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिली.
उदगीरात वाहतुकीची कोंडी कायम...
सध्या हातगाडे व ऑटो रस्त्याच्या मध्यभागी थांबून वाहतूकीची कोंडी करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पोलीस चौकीसमोर हातगाडा थांबून वाहतुकीची कोंडी करीत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. पालिका प्रशासनाकडून शून्य कार्यवाही असल्याने आता उदगीरच्या रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालत जाणे कठीण झाले आहे. उदगीर शहरात पालिका प्रशासन आहे की नाही असा प्रश्न उदगीरकरांना पडला आहे.