पावसाअभावी खरीप धोक्यात; तात्काळ पंचनाम्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश
By हरी मोकाशे | Published: September 2, 2023 07:31 PM2023-09-02T19:31:44+5:302023-09-02T19:33:35+5:30
लातूर : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, असे ...
लातूर : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही योग्य नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री महाजन यांनी दिले आहेत. या अनुषंगाने शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. पीकविम्यासंदर्भात योग्य कारवाई लवकरात लवकर करावी. पाऊस लांबल्याने टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन कृषी, महसूल व संलग्न सर्व विभागांनी उपाययोजनांचे योग्य नियोजन करावे. यात दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केल्या आहेत.
खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही गतीने करावी, अशी सूचना पालकमंत्र्यांकडून देण्यात आली.
पाण्याचे नियोजन करावे...
लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाची पाणीपातळी २४ टक्क्यांपेक्षाही खाली गेली आहे. या बाबीचे गांभीर्य ओळखून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणीसाठा राखीव ठेवण्यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. पाटबंधारे विभागाच्या यंत्रणांनी त्याचे काटेकोर पालन करावे. तसेच कोठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केल्या.