खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्णत्वाकडे; आंतरमशागतीच्या कामांस वेग
By हरी मोकाशे | Published: July 5, 2024 05:20 PM2024-07-05T17:20:54+5:302024-07-05T17:21:17+5:30
लातूर जिल्ह्यात ९६.३३ टक्के पेरण्या पूर्ण
लातूर : जिल्ह्यात यंदा वेळेवर मृग बरसल्याने आणि त्यानंतर मध्यंतरी आर्द्राचा पाऊस झाल्याने खरीप पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत. आतापर्यंत ९६.३३ टक्के पेरा झाला आहे. दरम्यान, पीकही चांगले उगवल्याने शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात खरीपाचे ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्र आहे. हवामान खात्याने यंदा वेळेवर मान्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. दरम्यान, मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली. पीकही चांगले उगवू लागले. तद्नंतर पावसाने उघडीप दिल्याने धास्ती वाढली होती. मात्र आर्द्रा नक्षत्राचा पाऊस झाला. त्यामुळे दिलासा मिळाला. शिवाय, रखडलेल्या पेरण्यांनाही वेग आला. जिल्ह्यात आतापर्यंत ९६.३३ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. आठवडाभरात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
कडधान्याचा पेरा वाढला...
तृणधान्य - ५९४२
कडधान्य - ८०१३७
गळीतधान्य - ४७५२५०
एकूण पेरा - ५७७४७७
जिल्ह्यात सोयाबीनची ११० टक्के पेरणी...
पीक - पेरणी
सोयाबीन - ४७४८८१
तूर - ६७७९१
मूग - ६६१०
उडीद - ५७२६
कापूस - १६१५८
तीळ - १३७
ज्वारी - १९६
आतापर्यंत सरासरी २३९ मिमी पाऊस...
तालुका - पाऊस (मिमी)
लातूर - २७३.२
औसा - ३०५.४
अहमदपूर - १९४.९
निलंगा - २४५.६
उदगीर - १७४.८
चाकूर - २५५.८
रेणापूर - ३०७.९
देवणी - १८२.८
शिरुर अनं. - १९७.०
जळकोट - १२५.८
एकूण - २३९.८
लातूर, औश्यात १०३ टक्के पेरणी...
जिल्ह्यात खरीप पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत. त्यापैकी लातूर आणि औसा तालुक्यात प्रत्येकी १०३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अहमदपूर- ९४.०६, निलंगा - ८९.१४, शिरुर अनंतपाळ - ९४.३४, उदगीर - ९४.१५, चाकूर - ९८.८४, रेणापूर -९९.४५, देवणी - ८५.८८, जळकोट तालुक्यात ९५.७७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वात कमी पेरणी देवणी तालुक्यात झाली आहे.
कोळपणी, खुरपणीत शेतकरी व्यस्त...
यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चांगले उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. पीक चांगले उगवले आहे. पिकांत तण दिसत असल्याने शेतकरी कोळपणी, खुरपणीच्या कामांत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी औषधांची फवारणी करीत आहेत.
रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास सल्ला घ्या...
यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पीकही चांगले उगवले असून सध्या बहरत आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने धास्ती वाढली होती. दरम्यान, पाऊस झाल्याने कोवळ्या पिकांना जीवदान मिळाले. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कृषी विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी.
- आर.टी. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.