लातूर जिल्ह्यात खरीपाचा पेरा केवळ ८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 05:49 PM2019-07-04T17:49:48+5:302019-07-04T17:54:17+5:30
पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत़
- आशपाक पठाण
लातूर : पावसाने हुलकावणी दिल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांना ब्रेक दिला आहे़ ४ जुलै पर्यंत जिल्ह्यात केवळ ८ ते १० टक्के खरीपाचा पेरा झाला असून, ९० टक्के शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत़ निलंगा, उदगीर व देवणी तालुक्यातील काही भाग वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 94 मिमी पाऊस झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत शेती करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी जून पर्यंत जमीनी पेरणीयोग्य करून ठेवल्या़ लातूर जिल्ह्यात खरीपाचे एकूण ६ लाख हेक्टर्स क्षेत्र आहे़ यात ८० टक्के पेरा हा सोयाबीनचा केला जातो़ गतवर्षी खरीप आणि रबी हंगाम हातचे गेल्याने यावर्षी तरी लवकर पेरण्या होतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते़ मात्र जिल्ह्यात निलंगा, अंबुलगा, उदगीर, देवणी परिसरात काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे़ मात्र इतर ठिकाणचे शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ खते, बियाणे खरेदी करून शेतकरी पावसाकडे लक्ष देऊन आहेत़ गेल्या १५ दिवसांपासून एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना आता पेरणीची चिंता लागली आहे़ जुलै उजाडला तरी जिल्ह्यात केवळ ८ ते १० टक्के पेरण्या झाल्या आहेत़ ९० टक्के शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ काही शेतकरी किरकोळ ओल असल्याने पावसाच्या आशेवर पेरण्या करीत आहेत़ मात्र आठ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचे अजूनही पुनरागमन झाले नसल्याने पेरण्या केलेले शेतकरीही चिंताग्रस्त आहेत़
उदगीर, देवणी, निलंग्यात पेरण्या
लातूर जिल्ह्यात खरीपाचे ६ लाख हेक्टर क्षेत्र आहे़ अद्यापपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही़ निलंगा तालुक्यातील अंबुलगा व परिसरात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला़ तसेच देवणी व उदगीर तालुक्यातील काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत़ शिवाय, लातूर, औसा, रेणापूर, चाकूर आदी ठिकाणी तुरळक पेरण्या झाल्या आहेत़ ४ जुलैपर्यंत केवळ ८ ते १० टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़
ओल पाहून निर्णय घ्या
शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करण्यापूर्वी जमिनीतील ओल तपासून घ्यावी़ किमान ६ इंच तरी ओलावा आवश्यक आहे़ जिल्ह्यात बहुतांश भागात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये़ काही ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवानुसार पेरण्या केल्या आहेत़ मात्र चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले आहे.