उदगीरात खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार - क्रीडामंत्री संजय बनसोडे
By संदीप शिंदे | Published: September 24, 2023 03:05 PM2023-09-24T15:05:29+5:302023-09-24T15:05:48+5:30
उदगीर येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा व व्हॉलीबॉलच्या स्पर्धाही होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
उदगीर : येथे राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा राष्ट्रीय क्रीडा दिनी होणार असल्याची घोषणा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी येथे केली. उदगीर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उदगीर येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा व व्हॉलीबॉलच्या स्पर्धाही होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमास अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त प्रा. गणपतराव माने, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त धर्मपाल गायकवाड, पवनराजे पाटील, दत्ता गलाले, फय्याज शेख, संगमेश्वर काळे, मलकापूरचे सरपंच गुरुनाथ बिरादार यांच्यासह प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले.
क्रीडा मंत्री संजय बनसोडे म्हणाले, राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन काम करीत आहे. राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथेही क्रीडा विद्यापीठ स्थापन केले जाणार असून, यासाठी ६५६ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल.
तसेच राज्यातील खेळाडूंच्या मदतीसाठी ऑलिम्पिक भवन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा विभागाने लक्षवेध योजना जाहीर केली असून यामध्ये विविध १२ क्रीडा प्रकारांच्या विकासावर भर देण्यात येत असून, पारंपारिक आदिवासी खेळांचा समावेशही क्रीडा प्रकारात करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन अनिता यलमट्टे यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर यांनी मानले. यावेळी खेळाडू, पालक, नागरिकांची उपस्थिती होती.
शालेय कुस्ती स्पर्धेत १६० स्पर्धकांचा सहभाग...
उदगीर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत राज्यातील ८ विभागांमधून १४ वर्षांखालील विविध वजनी गटातील १६० स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची मध्यप्रदेशातील विदिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार आहे, असेही क्रीडामंत्री संजय बनसोडे यावेळी म्हणाले.