Killari Earthquake : अनाथ गणेश बिराजदार यांची आपबिती : भूकंपात कुटुंबातील ९ जणांचा गेला होता बळी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 04:15 AM2018-09-30T04:15:11+5:302018-09-30T11:26:50+5:30

Killari Earthquake : मनावरील तो आघात काहीकेल्या मिटेना

Killari Earthquake: Anthropologist Ganesh Birajdar assessed: 9 families of the family were killed in the earthquake ... | Killari Earthquake : अनाथ गणेश बिराजदार यांची आपबिती : भूकंपात कुटुंबातील ९ जणांचा गेला होता बळी...

Killari Earthquake : अनाथ गणेश बिराजदार यांची आपबिती : भूकंपात कुटुंबातील ९ जणांचा गेला होता बळी...

Next

बालाजी बिराजदार
(लोहारा) जि. उस्मानाबाद  : काही सेकंदात सर्वच नातीगोती पुसून टाकणारा भूकंप काय असतो, हे मला त्या काळरात्री समजले़ अवघ्या क्षणात माझ्या कुटूंबातील ९ जणांचा बळी गेला़ आजोबांच्या आग्रहाखातर घरालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेला असल्याने मी वाचलो़ वाचलो खरे, पण त्यानंतर माझ्या वाट्याला आलेला संघर्ष, पोरकेपणाची भावना, झालेला आघात अजूनही पुसला जात नाही़ ती रात्र आठवली की मन विषन्न होते़ विचारचक्र पूर्णपणे थांबतात़ माझे स्वत्व विसरुन जायला होते, असे क्लेषमय कथन तावशीगड येथील गणेश बिराजदार यांनी केले़

भूकंपाच्या वेळी गणेश बिराजदार ९ वर्षांचे होते़ तोपर्यंत त्यांना भूकंप काय असतो, हे माहितही नव्हते़ त्यांच्या कुटूंबात त्यांच्यासह एकूण ११ जण होते़ त्या काळरात्री सर्वांनी भोजन घेतले अन् घरातच झोपण्यासाठी आपापल्या खोल्यांत गेले़ मात्र, आजोबांनी आग्रह केल्याने गणेश लगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपण्यासाठी गेला़ गाढ झोपेत असतानाच अचानक जमीन गडगडली अन् घर क्षणाधार्थ कोसळले़ घरात झोपलेले आई-वडील, बहीण, भाऊ, चुलते असे ९ जण माती-दगडाच्या ढिगाखाली दबले गेले़ यातून आईला बाहेर निघाली, पण ती गंभीर जखमी झाली होती़ तिला सोलापूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते़ चार दिवसानंतर तिचाही मृत्यू झाला अन् गणेशच्या वाट्याला अनाथाचे जिणे आले़ तोपर्यंत काय चाललंय? हेच कळत नव्हते.


या आघातातून पटकन सावरण्याइतके बालमन प्रगल्भ नव्हते़ काही दिवसांनी भारतीय जैन संघटनेचे काही पदाधिकारी गावात आले़ ते अनाथांना शिक्षणासाठी घेऊन जात होते़ त्यांच्यासमवेत मलाही पाठविण्यात आले़ त्यांच्याच शिकवणीतून मनाला थोडीशी उभारी मिळाली़ लढण्याची जिद्द जागली़ परिस्थितीशी झगडण्याचे बळ अंगी आले़ मात्र, १०वी पूर्ण होताच आजारपण आले़ त्यामुळे गावाकडे भूकंपातून जगलेल्या एका चुलत्यांकडे गणेश वास्तव्यास आले़ येथे राहून कृषी पदविकेचे एक वर्ष पूर्ण केले़ पुढे कौटुंबिक कारणास्तव त्यांच्यापासून वेगळे रहावे लागले़ यानंतर उदतपूर येथील मामाच्या आश्रयाला जावे लागले़ तेथे राहून पदविका पूर्ण केली़ यानंतर अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी उमरगा, बलसूर येथे भटकत रहावे लागले़ कृषी पदविका झाल्याने जागा निघाल्या की अर्ज भरत रहायचे़ नोकरीसाठी राज्यभर भटकण्याची उपेक्षा पदरी आली़ याकाळात आर्थिक अडचणींमुळे उपासपोटी राहण्याची वेळही आली़ तरीही संघर्ष आपल्या पाचवीला पूजल्याचे सांगत, मनाची समजूत काढत अविरत प्रयत्न सुरुच ठेवले़ २००८ मध्ये अखेर आपल्या संघर्षाला यश आले अन् नागपूरमध्ये कृषी सहायक म्हणून निवड झाल्याचे गणेश सांगत होते़ तेथे चार वर्षे नोकरी केल्यानंतर विनंती बदलीने लोहारा तालुक्यातील जेवळी येथे त्यांना पदस्थापना मिळाली़ आता सर्वकाही नेटके सुरु आहे़ मात्र, आपण कितीही संपन्न झालो तरी पोरकेपणाची भावना आपल्याला आपली जागा दाखवतच राहते़ 

कुटुंबाच्या आठवणीने जीव होतो व्याकूळ...
भूकंप झाला त्यावेळी गणेश बिराजदार हे केवळ नऊ वर्षांचे होते. भूकंप काय असतो, हे त्यांना माहीतही नव्हते. प्रलयंकारी घटनेत त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मृत्युमुखी पडले. त्यामुळे गणेश बिराजदार अनाथ झाले. आपल्या कुटुंबाची आठवण सांगताना ते म्हणाले, आई-वडिलांची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. त्यांचे प्रेम, माया, वात्सल्य याला मी मुकलो आहे.

Web Title: Killari Earthquake: Anthropologist Ganesh Birajdar assessed: 9 families of the family were killed in the earthquake ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.