Killari Earthquake : घर पुरेना, जमीन मिळेना, 25 वर्षानंतरही पीडितांची पडझड सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 04:51 AM2018-09-30T04:51:02+5:302018-09-30T11:24:20+5:30
कुटुंबे वाढली, पण घर वाढवता येत नाही : वेगळे राहावे म्हटले, तर जमीन मालकीची नाही
चेतन धनुरे
उस्मानाबाद : भूकंपानंतर बाधितांना पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जागेमध्ये भूकंप अवरोधक घरे बांधून देण्यात आली़ अनेक ठिकाणी कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून घरे बांधून दिली आहेत़ यापैकी काही कंपन्यांनी बांधून दिलेल्या घरांचा बांधकामाचा दर्जा सुमार निघाला. तर अवघ्या २५ वर्षांतच यातील काही घरे गळू लागली आहेत, काही घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत.
लोहारा तालुक्यातील होळी गावात अशी प्रातिनिधिक उदाहरणे पहावयास मिळाली़ येथे एका बँकेने ४३४ घरे बांधून दिली आहेत़ तर अन्य एका व्यवसायिक कंपनीने ९४ घरे बांधली आहेत़ बँकेची घरे अजूनही मजबूत आहेत़ तर दुसºया कंपनीने बांधून दिलेल्या घराला तडे गेले आहेत़ छत गळू लागले आहे़ हीच स्थिती राहिल्यास घरे पुन्हा एखाद्या धक्क्याने कोलमडतील, अशी भीती होळीचे सरपंच व्यंकट माळी यांना आहे.
अशीच काहिशी अवस्था येथील पायाभूत सुविधांची झाली आहे़ २५ वर्षांपूर्वी झालेले रस्ते पूर्णत: उखडले आहेत़ अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर करण्याचे प्रयत्न २५ वर्षांत झाले नाहीत. भूकंप बाधितांना पुनर्वसित ठिकाणी तीन खोल्यांची घरे देण्यात आली आहेत़ यादरम्यानच्या काळात घरातील मुले मोठी झाली़ अनेकांची लग्ने झाली आहेत़ त्यामुळे आता या कुटूंबांना घराची समस्या भेडसावत आहे़
विभक्त राहून दुसरीकडे घर बांधावे तर जागाही नाही़ कारण; पुनर्वसित गावांची जमीन आजही महसूल विभागाच्या च्या ताब्यात आहे़ याठिकाणच्या मोकळ्या जागांची खरेदी-विक्री होऊ शकत नाही़ आहे त्या जागेतच बांधकाम वाढविण्याइतकी मजबुती सध्याच्या घरांची नाही.
या अडचणींमुळे कुटूंबे बेजार आहेत़ आता नवे घर बांधायचे तर गावाबाहेर जागा घ्यावी लागते अन् मगच बांधकाम करावे लागते़ वस्ती सोडून एकट्याने गावाबाहेर राहण्यात धोका असल्याने तसे धाडसही कोणी करेना. घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठीही याच अडचणींचा ब्रेक लागत आहे. सध्या वास्तव्यास असलेले घर हे ‘आरसीसी’ असल्याने घरकुलाच्या निकषात भूकंपग्रस्त भागातील लोक अपात्र ठरत आहेत़ शिवाय, लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे गावात जागाही नाही़ त्यामुळे ही योजना जणू या पुनर्वसित गावांसाठी कागदावरच आहे. या अडचणीतून मार्ग निघत नसल्याने अनेकांनी घरापुढील मोकळ्या जागेतच पत्र्याचे शेड उभारुन घराचा तात्पुरता विस्तार साधला आहे.
‘रह गुजर ही को ठिकाणा कर लिया, कब तलक हम ख्वाब घर के देखते’ असे गझलकार मनिष शुक्ला यांनी आपल्या एका गझलेत म्हटले आहे़ अगदी तशीच अवस्था इथल्या भूकंप बाधितांची आहे़