Killari Earthquake : त्या रात्री... डोळ्यांदेखत आई-वडील, भाऊ-बहीण सारे काही संपले, तरीही....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 04:41 AM2018-09-30T04:41:05+5:302018-09-30T11:24:48+5:30
त्या रात्री... उभ्या राहिलेल्या मनीषाताईंच्या आयुष्याची कहाणी..
धर्मराज हल्लाळे
लातूर : ‘भूकंप झाला आणि हसलगण (ता. लोहारा) गावात घरांचे ढिगारे झाले. आम्ही भाऊ-बहीण, आई-वडील आमच्याच उद्ध्वस्त झालेल्या घरात मातीच्या ढिगाºयाखाली होतो. आईचा आवाज येत नव्हता. वडील बोलत होते. ते माझ्या लेकरांना वाचवा म्हणत होते. लहान असलेला माझा भाऊ राम जोरजोरात ओरडत होता. मला उठता का येत नाही. माझ्या अंगावर माती का पडली आहे, असा त्याचा आक्रोश चालला होता. घरावरील लाकडे आमच्या अंगावर पडल्यामुळे दगड-माती थेट पडली नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलत होतो. वडिलांनी आईला हाक मारली. तिचा आवाज आला नाही. माझी बहीण जनाबाई, आणि मी एकमेकींशी बोलत होतो...’
अंगावर शहारे आणणारा हा अनुभव सांगताना मनीषा आप्पासाहेब मोरे पंचवीस वर्षांनंतरही गहिवरून गेल्या होत्या. मातीच्या ढिगाºयाखाली अडकलेला त्यांचा लहान भाऊ राम हाही खूपच घाबरून गेला होता. त्याचे ओरडणे थांबत नव्हते. त्यावेळी मोठी बहीण जनाबाई म्हणाली, ‘ओरडू नको.. आपल्यालाही कोणी तरी येऊन बाहेर काढेल. शांतपणे पडून राहा. ओरडून दमशील.’ त्यावेळी मनीषा दहा वर्षांच्या होत्या. मनीषा, जनाबाई, राम हे एकमेकांच्या आजूबाजूला असूनही एकमेकांना पाहू शकत नव्हते. अंधार, धूळ, माती सगळीकडे पसरली होती. घरावरील माळवदाच्या लाकडांमुळे ते बचावले होते. मात्र आधीपासूनच त्यांच्या आईचा आवाज येत नव्हता. नंतर रामही बोलायचा थांबला. वडिलांचाही आवाज क्षीण झाला.
जनाबाई आणि मनीषा यांना मात्र त्यांच्यावर असलेल्या ढिगाऱ्याांमधून लोकांचे आवाज ऐकू येत होते. काही वेळाने त्यांना एकेकाला बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत आईने प्राण सोडले होते. वडील विव्हळत होते. भाऊही वाचवा वाचवा म्हणून निपचित पडला होता. दोघी बहिणी वाचल्या होत्या. सभोवताली अंधार. लोक मातीने माखलेले. ते पाहून त्या दोघीही प्रचंड घाबरल्या.
वडील म्हणाले, माझ्या लेकरांना आणा. दोघी बहिणी समोरच थांबल्या होत्या. मात्र त्यांच्या बाजूलाच पत्नी आणि लहान मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनी जोरदार टाहो फोडला अन् एका क्षणात त्यांनीही मान टाकली.
- मनीषा यांच्या परिवारातील सर्वात मोठी बहीण लग्न झाल्याने सासरी होती. मात्र भूकंपाने मनीषा व जनाबाई या दोघी बहिणी पोरक्या झाल्या. काही दिवस शेतामध्येच उभारलेल्या छावण्यांमध्ये राहिल्या. बहिणींमध्ये मनीषा यांना शाळेची आवड होती. त्यावेळी भूकंपानंतर अनेक संस्थांनी मदतीचे हात पुढे केले होते. एसओएस संस्थेमधून राम यादव आले. त्यांनी धीर दिला. तद्नंतर मनीषा लातूरच्या एसओएस बालग्राममध्ये दाखल झाली. आणि तिथे तिला आई मिळाली. सुनंदा लिंबापुरे या बालग्राममधील मदर. त्यांच्यासोबत मनीषासह नऊ जणांचा परिवार होता.
आज त्या परिवारातील सर्वच मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत. मदर सुनंदा यांनी मनीषाला आईची उणीव भासू दिली नाही. तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तिचे आयुष्य एसओएसमध्ये घडल्यामुळे आपले लग्नही एसओएसमध्ये व्हावे, अशी मनीषा इच्छा होती. उमरगा तालुक्यातीलच शाहुराज धुमाळ यांच्याशी तिचा विवाह झाला. आज मनीषा आपल्या परिवारासह पुण्यात राहते. ती परिचारिका म्हणून सेवा बजावते. पती कंपनीत अधिकारी आहेत. शेवटी मनीषा म्हणते, भूकंपाने आमच्यापासून सर्वकाही हिरावले. मात्र संस्था आणि समाजाच्या पाठबळावर आज माझ्यासारख्या पोरक्या झालेल्या लेकरांनाही परिवार मिळाला आहे.