Killari Earthquake : पोसणारा निसर्ग जेव्हा क्रूर होतो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 06:00 PM2018-10-01T18:00:03+5:302018-10-01T18:00:50+5:30
मी सध्या अमेरिकेत आहे आणि अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवर फ्लोरेन्स चक्रीवादळाने थैमान घातले आहे. अशात पंचवीस वर्षांपूर्वीच्या किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या आठवणीने मनाचा थरकाप उडाला आहे.
- प्राचार्य दिलीप गौर
लोकमत’च्या टीमसोबत पहिल्या दिवशी मी त्या भूकंपग्रस्त भागात पोहोचलो होतो. आपल्याला पोसणारा निसर्ग जेव्हा क्रूर होतो, निर्दयी होतो तेव्हा विक्राळ काळाच्या पायाखाली, त्याच्याच पिलांना चिरडून टाकतो. सास्तूर, होळी, कवठा, किल्लारी अशा अनेक गावांमध्ये मृत्यूने नुसते थैमान घातले होते. अनेक गावे जमीनदोस्त झाली होती.
विघ्नहर्त्या बाप्पाला निरोप देऊन, गाढ झोपलेल्या त्याच्या भक्तांनी, या जगाचा कायमचा निरोप घेतला होता! बाया, बापे, तरुण, वृद्ध, अगदी लहान मुले सर्व दगड, माती आणि लाकडाच्या ढिगाऱ्याखाली निपचित पडली होती पुन्हा कधीही न उठण्यासाठी! जगाच्या कटकटीला कंटाळलेला, हरलेला, थकलेला जीव ज्या घराच्या आसऱ्याला जातो, त्याच घराने त्याला गाडून टाकले होते. गरीब, श्रीमंत, राव आणि रंक सब जमीनदोस्त. ज्या चिरेबंदी वाड्यांमध्ये प्रवेश करायला, वाऱ्यालाही संकोच वाटत असेल, तिथे मृत्यूने कुणालाही शेवटचा उसासा घेण्याचीही सवड दिली नव्हती. गावकुसाबाहेरच्या झोपड्या मात्र शाबूत होत्या.
दगड, मातीच्या, लाकडी माळवदाच्या ढिगाऱ्याखालून डोकावणारे निर्जीव माणसांचे हात, पाय, डोके, केस, कपडे मन विषण्ण करणारे होते. त्या संपूर्ण परिसराला मृत्यूचा, मनातील काळोखाला डिवचणारा, भयानक असा दर्प येत होता. तो आजही येथे अमेरिकेत मला जाणवतो आहे. तो माझ्या आयुष्यातील एकमेव दिवस असेल, जेव्हा मी कुणाच्याही चेहऱ्यावर, एकही हास्याची लकेर बघितली नसेल.
जो कुणी वाचला होता, तो भांबावून गेला होता, वेडावून गेला होता. कारण त्या गावच्या गल्ल्या, तो पार, ते पाणवठे, सारे काही निर्जीव, निर्विकार झाले होते; पण एक चमत्कार आजही आठवणीत ताजा आहे. सास्तूरला मातीच्या ढिगाऱ्याखालून तान्हुल्याचा रडण्याचा आवाज येत होता. आवाज खूपच क्षीण होता. आम्ही भराभर माती बाजूला सारली. खाली एक आई होती. तिने संपूर्ण मलबा आपल्या अंगावर झेलून, तिच्या बाळाला वाचवले होते. आमच्या टीम सोबतचे डॉक्टर्स बाळाला वाचविण्यात यशस्वी ठरले; पण माता मात्र गेलेलीच होती. ‘जन्मभूमीने मारले; पण जननीने तारले’ असेच म्हणावे लागेल.