हुंड्यासाठी विवाहितेचा खून; आरोपीस १३ वर्षांचा कारावास

By राजकुमार जोंधळे | Published: December 16, 2023 08:31 PM2023-12-16T20:31:45+5:302023-12-16T20:32:04+5:30

१५ हजारांचा दंड : निलंगा न्यायालयाचा निकाल. 

Killing a married woman for dowry 13 years imprisonment for the accused | हुंड्यासाठी विवाहितेचा खून; आरोपीस १३ वर्षांचा कारावास

हुंड्यासाठी विवाहितेचा खून; आरोपीस १३ वर्षांचा कारावास

लातूर : माहेरहून दुकान टाकण्यासाठी दोन लाख घेवून ये म्हणून नवऱ्याने सतत छळ केला. शिवाय, मारहाण करुन गळफास देवून खून केल्याप्रकरणी आरोपीला निलंगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रमोद नागलकर यांनी १३ वर्षांचा कारावास आणि १५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. 

पोलिसांनी सांगितले, मन्मथ चनप्पा टेकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १२ फेब्रुवारी २०२० रोजी शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात गुरनं. २८/२०२० कलम ३०२, २०१, ३०४ (ब), ४९८ (अ) आणि एस.सी. नंबर १०/२०२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीची मुलगी शुभांगी हिला माहेरहून दुकान टाकण्यासाठी दाेन लाख रुपये घेवून ये म्हणून तिचा पती आकाश विनोद भुजंगा याने सतत शिवीगाळ करुन, मानसिक छळ करुन, मारहाण करुन गळफास देवून खून केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. दरम्यान, शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी या गुन्ह्याचा तपास करुन निलंगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

निलंगा न्यायालयात खटला चालला अंडरट्रायल...

सबळ पुराव्याच्या आधारे आरोपीविरोधात हा खटला अंडरट्रायल चालवून आरोप सिद्ध करण्यात आला. त्यानुसार न्यायाधीश प्रमोद नागलकर यांनी साक्ष आणि सबळ पुराव्याच्या आधारे आरोपीला १३ वर्षांचा कारावास आणि १५ हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने अॅड. महेश जाधव यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार शौकत बेग, कोम्पले यांनी काम पाहिले. तर वॉरंट काढण्याचे काम सहायक फौजदार गिरी यांनी केले, अशी माहिती पोलिस निरीक्षक पी. बी. कदम यांनी दिली.
 

Web Title: Killing a married woman for dowry 13 years imprisonment for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर