पायी चालण्याची सवय माेडल्यानेच तरुणाईत गुडघा, कंबरदुखीचे आजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:26+5:302021-09-27T04:21:26+5:30
काही वर्षांपूर्वी बहुतांश नागरिक पायी चालत हाेते. आता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पाहिजे त्या मार्गावर वाहन सहज उपलब्ध ...
काही वर्षांपूर्वी बहुतांश नागरिक पायी चालत हाेते. आता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पाहिजे त्या मार्गावर वाहन सहज उपलब्ध हाेत आहे. यातून चालण्याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. एवढेच नाही तर सायकलही आता हद्दपार हाेत आहे. यामुळे शरीराच्या सवयीतही बदल झाला आहे. अनेकांची पायी चालण्याची सवयच माेडली आहे. त्याचे दुष्परिणाम समाेर येत आहेत. अनेकांना कमी वयातच गुडघे, कंबरदुखीचे आजार जडले आहेत.
या कारणांसाठीच हाेतय चालणे...
१ ज्या मार्गावर वाहन नाही, अशा मार्गावरच जाण्यासाठी पायी चालावे लागत आहे.
२ अनेक नागरिक कार्यालय, बाहेर पाेहोचण्यासाठी पायी चालण्याचा प्रयत्न करतात.
३ तरुण गल्लीतील मित्र-मैत्रीणींना भेटण्यासाठी त्यांच्या घरापर्यंतच पायी चालतात.
हे करून पाहा...
१ एक किलाेमीटर परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळावा.
२ एखादे काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या.
३ घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर करणे टाळावे.
म्हणून वाढले हाडांचे आजार...
दरराेजच्या चालण्यातून कॅल्शिअम डिपाॅझिशन हाेते. पायाचा रक्तप्रवाह चांगला राहताे. हाडांच्या आराेग्यासाठी, सांधे मजबूत करण्यासाठी दरराेज अर्धा तास चालण्याची गरज आहे. यामुळे हृदय उत्तम राहते, असे आराेग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांच्यासाठी...
सध्याच्या दगदगीच्या जीवनशैलीसाठी दरराेजचा व्यायाम आवश्यक आहे. किमान ३० मिनिटे आणि आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करावा. यातून बीपी, शुगर व ब्लाॅकेजेस हाेण्याचा धाेका कमी हाेताे. शक्य झाले तर व्यायाम करावा, असे लातूर येथील डाॅ. विश्रांत भारती यांनी सांगितले.