कवठाळ्यातील वस्तीत गुडघाभर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:24 AM2021-09-06T04:24:21+5:302021-09-06T04:24:21+5:30
वलांडी : देवणी तालुक्यातील कवठाळा येथील दलित वस्तीत गुडघाभर पाणी साचत आहे. त्यामुळे डासोत्पत्ती वाढली असून, दुर्गंधीचा त्रासही सहन ...
वलांडी : देवणी तालुक्यातील कवठाळा येथील दलित वस्तीत गुडघाभर पाणी साचत आहे. त्यामुळे डासोत्पत्ती वाढली असून, दुर्गंधीचा त्रासही सहन करावा लागत आहे. तसेच ये-जा करताना आबालवृध्दांना कसरत करावी लागत आहे. नाले बांधकामाकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
नांदेड - गुलबर्गा हा जुन्या काळातील मात्र नव्याने झालेला राज्यमार्ग आहे. या मार्गावर देवणी तालुक्यातील ममदापूर, सय्यदपूर, कवठाळा, वलांडी, बोंबळी ही गावे आहेत. हा रस्ता कर्नाटकातील भालकीमार्गे गुलबर्ग्याला जोडण्यात आला आहे. देवणी तालुक्यातील कवठाळा गावाच्या मध्यभागातून आणि दलित वस्तीतून हा राज्यमार्ग आहे. सध्या पावसाळ्यामुळे या मार्गावरील दलित वस्तीत गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. याशिवाय पादचाऱ्यांचेही हाल होत आहेत.
वास्तविक पाहता, राज्य मार्गाचे काम करताना पाणी वाहून जाण्यासाठी नाले काढणे गरजेचे होते. परंतु, त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. नाले बांधकाम करण्यात आले नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
नागरिकांची सातत्याने कसरत...
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे वस्तीत पाणी साचत आहे. त्यामुळे ये-जा करताना अडचण येत आहे. याशिवाय, रोगराई पसरण्याची भीती आहे. यासंदर्भात कवठाळ्याचे सरपंच शंकर हुडे यांनी संबंधित विभागाला सातत्याने माहिती देऊन नाले बांधकाम करण्याची मागणी केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे वस्तीतील रोहिदास सूर्यवंशी यांनी सांगून तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
तहसीलदारांना नागरिकांचे साकडे...
कवठाळ्यातील दलित वस्तीत नाले निर्माण करण्यात यावेत आणि साचणाऱ्या पाण्याला वाट करुन द्यावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरम्यान, वस्तीतील रोहिदास सूर्यवंशी यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन साकडे घातले आहे. हे काम तत्काळ न झाल्यास आत्मदहन करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.