आता समस्या जाणून घेतोय, लवकरच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर रान उठवणार: अमित ठाकरे
By राजकुमार जोंधळे | Published: October 8, 2022 06:57 PM2022-10-08T18:57:40+5:302022-10-08T18:58:15+5:30
विद्यार्थ्यांच्या समस्या साेडविण्याला प्राधान्य, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे
लातूर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी मी महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर आहे. प्रारंभी मी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणार आहे. यासाठी मी काेकण दाैरा केला आणि महाराष्ट्रातील इतर भागातही जावून आलाे. आज मराठवाड्याच्या दाैऱ्यावर आलाे आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या साेडविण्याला आपले प्राधान्य राहणार आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शनिवारी लातुरातील पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखांची स्थापना करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन स्तरावर असलेल्या विविध समस्या जाणून घेत त्या साेडवून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न विद्यार्थी सेनेचा आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रान उठविण्यासाठी सध्याला विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी सुरु आहे. यासाठी मला लातुरात माेठ्या संख्येने विद्यार्थी भेटले. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. आता पुढे टप्प्या-टप्प्याने मी प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. या दाैऱ्यातून मला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची माहिती घ्यायची आहे. त्या भविष्यात कशा साेडवायच्या याची रणनिती आखता येणार आहे, असेही अमित ठाकरे म्हणाले.
संघटनात्मक बांधणीचा प्रयत्न...
महाविद्यालयीन स्तरावरील प्रश्न आणि विविध समस्या साेडविण्यासाठी संघटनात्मक बांधणीचा माझा प्रारंभी प्रयत्न सुरु आहे. अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समस्या साेडविण्यासाठी काेणीच वाली नाही. यासाठी आता मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून या समस्या साेडविण्याला प्राधान्य राहणार आहे. मी आज आपल्यांकडून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लातुरात आलाेय, असेही ठाकरे म्हणाले.