खंडणीसाठी काेयता गँगचा राडा! ट्रॅव्हल्स, कारच्या काचा फाेडल्या; दाेघांविराेधात गुन्हा दाखल, एकाला अटक
By राजकुमार जोंधळे | Published: March 17, 2024 08:16 AM2024-03-17T08:16:03+5:302024-03-17T08:16:52+5:30
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेघांपैकी एकाला पाेलिसांनी अटक केली.
लातूर : काेयता गँगने राडा करत ट्रॅव्हल्स, कारसह इतर वाहनांच्या काचा फाेडून माेठे नुकसान केले. शिवाय, एका भाजी विक्रेत्याकडून खंडणीची मागणी करून ती वसूल केल्याची घटना लातुरात बार्शी राेडवर ९ वाजण्याच्या रात्री घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेघांपैकी एकाला पाेलिसांनी अटक केली.
पाेलिसांनी सांगितले, लातुरात बार्शी राेडवरील एका पेट्राेलपंपासमाेर रात्री अचानक दाेन तरुण हातात काेयता घेतलेले दिसले. ते वाहनांवर दगडफेक करून काचा फाेडत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत हाेते. दरम्यान, स्थानिक नागरिकांना, छाेट्या व्यावसायिकांना काेयत्याचा धाक दाखवत राडा घातला. नेमके काय हाेत आहे, हे स्थानिक नागरिकांना समजत नव्हते. हातातील कत्ती, काेयत्याचा धाक दाखवून दाेघांनी हरंगुळ येथील एकाला वाटेतच अडवून वाहनाच्या काचा फाेडल्या. त्यांच्याकडील दाेन माेबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्याचबराेबर तेथे थांबलेल्या एका ट्रॅव्हल्सवरही त्यांनी दगडफेक करून काच फाेडली. तर भाजी विक्रेत्याला, “तुला भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला ५०० रुपये द्यावे लागतील,” असे म्हणून खंडणीची मागणी करीत पैसे वसूल केले.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ताैहिल अकबर पठाण (वय २१, रा. वीर हनुमंतवाडी, लातूर) आणि वैभव ऊर्फ माेन्या शिवराज बनसाेडे (रा. पटेल नगर, लातूर) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून पळालेल्या दाेघांपैकी ताैहिल अकबर पठाणच्या पाेलिसांनी काही तासांमध्येच मुसक्या आवळल्या.
ट्रॅव्हल्स अन् कारचे एक लाखाचे नुकसान...
रात्री ९ वाजण्याच्या सुमारास, वर्दळीच्या रस्त्यावरच हातात काेयता, कत्ती घेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाेघांनी दिसेल त्या वाहनावर दगडफेक केली. यामध्ये ट्रॅव्हल्ससह इतर वाहनांच्या काचा फाेडल्याने जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यातील एकाला अटक केली असून, दुसऱ्याला लवकरच अटक केली जाईल. - साहेबराव नरवाडे, पाेलिस निरीक्षक, लातूर