म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांसह नातेवाईकांची धावाधाव सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:34+5:302021-05-16T04:18:34+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. कोरोनातून ठणठणीत झालेल्यांमध्ये आता बुरशीमुळे होणारा ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. कोरोनातून ठणठणीत झालेल्यांमध्ये आता बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिस आजार आढळून येत आहे. शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आतापर्यंत सदरील आजाराचे २५ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील तिघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती चांगली झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. सध्या तीन रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय, एका रुग्णाच्या मेंदुपर्यंत हा त्रास पोहोचल्याने मुंबईला तर एकास औरंगाबादला पाठविण्यात आले आहे.
या आजाराचा नाक, दात, डोळे आणि मेंदुवर आघात होतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे जाणवू लागताच तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन सल्ला घेणे गरजेचे ठरत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सदरील आजारावरील आवश्यक असलेल्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरु आहे.
०७ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आढळलेले रुग्ण
५६ यापूर्वी इंजेक्शन लागायचे वर्षाला
१० इंजेक्शनची सध्या दररोज मागणी
इंजेक्शन मिळत नसल्याने समस्या...
यापूर्वी म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण जिल्ह्यात क्वचित आढळून येत असत. वर्षभरातून एखाद, दुस-या रुग्णास सदरील आजार झाल्याचे निष्पन्न होत असे. मात्र, आता अचानकपणे विविध प्रकारचे इंजेक्शन आणि औषधींची मागणी वाढली आहे. सुरुवातीस जिल्ह्यात इंजेक्शन सहजरित्या मिळत असत. परंतु, आता इंजेक्शनच मिळेनासे झाले आहे.
सदरील आजारावर लिपोसोमल एम्फोिटसिरीन बी इंजेक्शनची आवश्यकता असते. परंतु, जिल्ह्यात हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून विविध ठिकाणी चौकशी केली जात आहे. काही नातेवाईक तर औरंगाबाद, पुणे, मुंबई, हैदराबाद येथेही चौकशी करीत आहेत. परंतु, तिथेही सदरील इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
रुग्ण वाढताच इंजेक्शचा तुटवडा...
पूर्वी जिल्ह्यास वर्षभरात एखादा अथवा दुसरा रुग्ण आढळून येत असे. दोन रुग्ण आढळले तरी त्यास १४ दिवसांत दररोज दोन इंजेक्शन द्यावे लागत असे. त्यामुळे वर्षभरात जास्तीत जास्त ५६ इंजेक्शन लागत असत. परंतु, आता रुग्ण संख्या वाढली असल्याने इंजेक्शनची मागणी वाढली आहे. परंतु, इंजेक्शनचा तुटवडा आहे.
नाक, जबडा, दात, डोळ्यांस फटका...
ही बुरशी सर्वप्रथम नाका- तोंडातून शरीरात प्रवेश करते. नाकाला व घशात सुज येते. हिरड्यावर सूज, वरील बाजूचे दात अचानक हालणे, डोळ्यांच्या बाजूस सूज येणे, जबड्याच्या वरच्या बाजूस काळे डाग दिसून येणे अशी लक्षणे दिसून येतात. हा आजार पसरत असल्याने वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
एका रुग्णाला किमान २८ डोसची आवश्यकता...
एका रुग्णाला दररोज दोन डोस द्यावे लागतात. त्यानुसार दोन आठवड्यांपर्यंत सदरील इंजेक्शन आणि औषधी घ्यावी लागतात. एका दिवसाच्या दोन डोससाठी किमान १५ हजार रुपये लागतात. याशिवाय, डॉक्टरांचे तपासणी, उपचार शुल्क, खाटांचे बिल वेगळे. एका रुग्णाला इंजेक्शनसाठी २ लाखापेक्षा अधिक खर्च करावा लागतो. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ही सुविधा मोफत आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात...
वेळीच निदान गरजेेचे...
जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे संशयित २५ जण आढळले आहेत. त्यातील ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ५ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वेळेच निदान करणे आवश्यक आहे.
- डॉ. विनोद कंदाकुरे, कान, नाक, घसा तज्ज्ञ.
वेळीच सल्ला घ्यावा...
असा आजार होऊ नये म्हणून रोग प्रतिकारशक्ती वाढावी. शरीरातील शुगर नियंत्रणात ठेवावी. चेहरा- नाकाची स्वच्छता राखावी. त्रास जाणवत असल्यास तात्काळ कान, नाक, घसा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. नंदकुमार डोळे, नेत्रतज्ज्ञ.
वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण बरा...
कोविडनंतर हा बुरशीजन्य आजार होतो. या आजाराचा संसर्ग नाकापासून सुरु होतो. जबडा, टाळू, डोळे आणि मेंदूरपर्यंत आजार पसरु शकतो. डोळ्यांच्या बाजूस सूज येणे, तोंडातील वरच्या बाजूचे हात दुखणे, हालणे, काळे डाग दिसून येणे अशी लक्षणे दिसून येतात. अशा परिस्थितीत तात्काळ उपचार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो.
- डॉ. रितेश वाधवानी, दंतरोगतज्ज्ञ, विभागप्रमुख.