उन्हामुळे रक्ताचा तुटवडा; शिबिरे होत नसल्याने नातेवाइकांची धावपळ
By हणमंत गायकवाड | Published: April 8, 2024 05:54 PM2024-04-08T17:54:20+5:302024-04-08T17:54:48+5:30
लातूर शहरातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्त गटाची कमतरता
लातूर : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीसह अन्य सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्त गटांचा तुटवडा आहे. यामुळे रुग्ण नातेवाइकांना रक्तगट बॅग मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. सरकारीसह अन्य सहा रक्तपेढ्या लातूर शहरात आहेत. या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता आहे.
गेल्या काही दिवसांपासून तीव्र ऊन आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. ३७ ते ३९ अंशांवर तापमान गेलेले आहे. यंदाचा उन्हाळा कडक आहे. उन्हाची तीव्रता लाहीलाही करणारी आहे. त्यामुळे शिबिरे होत नाहीत. शिबिरे झाली तरी प्रतिसाद मिळत नाही. सात एप्रिल रोजी रविवार असल्याने काही ठिकाणी रक्तदान शिबिरे झाली. त्यातून काही रक्त बाटल्या संकलित झाल्या आहेत. हा रुग्ण नातेवाइकांसाठी काही अंशी दिलासा म्हणावा लागेल. पण उन्हाच्या तीव्रतेमुळे रक्तदान शिबिरे होत नाहीत. त्यामुळे बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे.
रक्तपेढ्यांमध्ये या रक्त गटांचा तुटवडा...
भालचंद्र रक्तपेढीत ए पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह निगेटिव्ह रक्त गटाचा तुटवडा आहे. या रक्तपेढीसाठी रविवारी एक-दोन रक्तदान शिबिर झाले. त्यातून काही बाटल्या रक्त संकलित झाल्या आहेत. हाच काय तो थोडा दिलासा आहे. मात्र रक्ताचा तुटवडा असल्याने नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
परीक्षा आणि लोकसभा निवडणुका असल्याने शिबिरांवर परिणाम.....
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ सध्या सुरू आहे. त्यामुळे एनसीसी एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून होणारे रक्तदानाचे कॅम्प होत नाहीत. दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. आता पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त आहेत. परिणामी, रक्तदान शिबिर आयोजित कोणी केले तरी तितका प्रतिसाद मिळत नाही. शिवाय, लोकसभा निवडणुकीच्या माहुल सध्या सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचार कामात अनेक संघटना, राजकीय पक्ष व्यस्त आहेत. त्याचा परिणाम रक्त तुटवड्यावर झाला आहे. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यानंतर हा तुटवडा कमी होईल. सध्या अत्यावश्यक आणि गरज असणाऱ्या रुग्णांसाठी रक्तपेढ्यांकडून रक्त उपलब्ध करून दिले जात असल्याचे अनेक रक्त बँकांकडून सांगण्यात आले.