साश्रूनयनांनी शहीद रामनाथ हाके यांना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 06:39 PM2017-08-27T18:39:19+5:302017-08-27T18:56:49+5:30
‘शहीद रामनाथ अमर रहे, अमर रहे’ अशा घोषणा देत साश्रू नयनांनी शहीद रामनाथ माधवराव हाके यांना त्यांच्या मष्णेरवाडी (ता़ चाकूर) या मुळ गावी रविवारी दुपारी ११.४५ वा़ अखेरचा निरोप देण्यात आला़.
चाकूर (लातूर ), दि. 27 : ‘शहीद रामनाथ अमर रहे, अमर रहे’ अशा घोषणा देत साश्रू नयनांनी शहीद रामनाथ माधवराव हाके यांना त्यांच्या मष्णेरवाडी (ता़ चाकूर) या मुळ गावी रविवारी दुपारी ११.४५ वा़ अखेरचा निरोप देण्यात आला़.त्यांच्या पार्थिवास त्यांचा लहान बंधू सचिन हाके यांनी भडाग्नी दिला़. प्रारंभी पोलीस दल, सैन्य दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली़.
चाकूर तालुक्यातील मष्णेरवाडी येथील रामनाथ माधवराव हाके यांचे शिक्षण चापोलीच्या संजीवनी महाविद्यालयात झाले होते़. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते २०१५ मध्ये सैन्यात दाखल झाले़. रामनाथ हाके यांची पोस्टिंग पश्चिम बंगालमधील नथूला येथे होती़. भारत- चीन सीमेवरील मॉगपॉग येथील १८ हजार फुट उंचीच्या टेकडीवर कर्तव्यावर असताना त्यांना आॅक्सिजन न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांच्यावर गंगाटोक येथे उपचार सुरु होते़.
दरम्यान, त्यांना पश्चिम बंगालमधील बागडोरा येथील सैन्याच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़. मात्र, २५ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली़ रामनाथ हाके यांचे पार्थिव बागडोरा येथून विमानाने दिल्ली मार्गे पुणे येथे आणण्यात आले. पुणे विमानतळावरुन रविवारी सकाळी ८़३० वा़ च्या सुमारास त्यांचे पार्थिव मष्णेरवाडी येथे आणण्यात आले़. यानंतर गावातील मारोती मंदिराजवळ अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.हजारो नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले़ दुपारी ११़.४५ वा़ च्या सुमारास रामनाथ यांच्या पार्थिवास त्यांचे लहान बंधू सचिन हाके यांनी भडाग्नी दिला़.
प्रारंभी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, तहसीलदार भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण केले़. यावेळी आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी सभापती राधाकिशन तेलंग, उपनगराध्यक्ष विलासराव पाटील, हणमंतराव पाटील, प्राचार्य डॉ़ धनंजय चाटे, सभापती अशोकराव चिंते, डॉ़ चंद्रप्रकाश नागिमे, सुभाष काटे, भाजपाचे बालाजी पाटील चाकूरकर, जि़प़ सदस्य सुधाकर श्रृंगारे, अरुणा कांबळे, अॅड़ युवराज पाटील, मल्लिकार्जून हराळे, अॅड़ अण्णाराव पाटील, प्रा़ श्रीहरी वेदपाठक, सरपंच फुलाबाई टाळकुटे आदींची उपस्थिती होती.
हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी़
नायब सुभेदार अवधेश सिंह यांच्या नेतृत्वाखाली सैन्य दलाच्या अहमदनगर येथील पथकाने व पोलीस दलाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली़. यावेळी सैन्य दलाचे औरंगाबाद येथील कर्नल जे़पी़ महाडिक उपस्थित होते़ मातृभूमीसाठी शहीद झालेला अमर राहतो, अशा शब्दांत कर्नल महाडिक यांनी श्रध्दांजली वाहिली़ तसेच त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन केले़
गावात ‘श्रीं’ची स्थापना नाही़
मष्णेरवाडी हे १२०० लोकसंख्येचे गाव आहे़ गावातील सहाजण सैन्य दलात आहेत़ रामनाथ हे शहीद झाल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली होती़ त्यामुळे गावात श्री गणरायाची स्थापना करण्यात आली नाही़