शहीद जवान संभाजी केंद्रे यांना अखेरचा निरोप
By हरी मोकाशे | Published: July 16, 2023 08:57 PM2023-07-16T20:57:13+5:302023-07-16T20:57:19+5:30
हवेत बंदुकीच्या फैरी झाडून पोलिस दलाने दिली मानवंदना
लातूर : सैन्य दलात कार्यरत असलेले केंद्रेवाडी (ता. चाकूर) जवान संभाजी केंद्रे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्यावर असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी केंद्रेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येऊन अखेरचा निरोप देण्यात आला. १४ वर्षीय मुलगा आर्यन याने पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
चाकूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील संभाजी हरिबा केंद्रे (३८) हे सन २००४ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते. १७ वर्षांपासून त्यांनी नायक पदावर जम्मू कश्मीर, श्रीनगर, भोपाळ, अहमदनगर येथे कार्य केले. सध्या ते अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत होते. कर्तव्यावर असताना गुरुवारी त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी केंद्रेवाडी येथे आणण्यात आले. दरम्यान, रायवाडी मोड ते केंद्रेवाडीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. पंचक्रोशीतील नागरिकांनी वीर नायक केंद्रे यांचे दर्शन घेत वीर नायक केंद्रे अमर रहे, अशा घोषणा दिल्या. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अखेरचा निराेप देण्यात आला.
वीर नायक केंद्रे अमर रहे...
वीर नायक केंद्रे अमर रहे... अशा घोषणा देत संभाजी केंद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेण्यात आले. यावेळी खा. सुधाकर शृंगारे, आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. विनायकराव पाटील, दिलीपराव देशमुख, तहसीलदार रेणुकादास देवणीकर, जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल शरद पांढरे, सुभेदार वेदपाठक, भारतीय माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन कृष्णा गिरी, विलास सूर्यवंशी, सुभेदार रमेश घुले, हवालदार बोकळे, नायब तहसीलदार डिगंबर स्वामी, तलाठी विष्णू वजिरे, शंकर लांडगे, सावित्राताई केदार, सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रतीक केदार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले.