शेवटचा अर्धा तास क्वाॅरंटाइन नागरिकांच्या मतदानासाठी प्रशासनाने ठेवला राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:48 AM2021-01-13T04:48:24+5:302021-01-13T04:48:24+5:30
प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य निरीक्षक म्हणून आरोग्य विभागाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर निवडणुकीच्या साहित्यासह ...
प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य निरीक्षक म्हणून आरोग्य विभागाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर निवडणुकीच्या साहित्यासह मास्क, सॅनिटायझरचे कीट देण्यात आले आहे. मतदानासाठी आलेल्या प्रत्येक मतदाराची थर्मल गनद्वारे तपासणीही होणार आहे. क्वाॅरंटाइन असलेल्या मतदारांना मतदान करता यावे, यासाठी शेवटच्या तासात त्यांना वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ आहे. ५.०० वाजेनंतर क्वाॅरंटाइन मतदार मतदान करतील.
मतदानाच्या रांगा संपल्यानंतर अर्धा तास
१५ जानेवारी रोजी १ हजार ४५९ मतदान केंद्रांवर ३८३ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. ७.३० ते ५.०० वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर क्वाॅरंटाइन असलेल्या नागरिकांना मतदान करण्यासाठी वेळ दिला आहे. यावेळी मतदानासाठी रांगा लागत नाहीत. शिवाय, मतदारांनी ४.३० वाजेच्या आत मतदान करावे. जेणेकरून क्वाॅरंटाइन असलेल्या नागरिकांना मतदान करण्यास अडचणी येणार नाहीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्वाॅरंटाइन नागरिक तसेच मतदान केंद्रावर कोरोना संशयित मतदार आढळल्यास त्यांना शेवटच्या अर्ध्या तासात मतदान करण्यास वेळ दिला जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य निरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात येईल. त्यानंतरच मतदानासाठी सोडले जाईल. या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन